कोल्हापूर : सहा बंधारे पाण्याखाली

पंचगंगेच्या पाणी पातळीत वाढ; सहा बंधारे पाण्याखाली
Rise in water level of Panchganga
पंचगंगेच्या पाणी पातळीत वाढPudhari File Photo

कोल्हापूर : धरण क्षेत्रात सुरू असलेल्या पावसामुळे पंचगंगेच्या पाणी पातळीत वाढ होत आहे. रविवारी सायंकाळी 7 वाजता पाणी पातळी 4 इंचांनी वाढून 17 फूट 10 इंचांवर पोहोचली असून राजाराम बंधार्‍यासह रुई, इचलकरंजी, सुर्वे, यवलूज व तेरवाड हे सहा बंधारे पाण्याखाली गेले आहेत. जिल्ह्यात सरासरी सर्वाधिक 34.4 मि.मी. पाऊस शाहूवाडी तालुक्यात झाला.

पावसाने जिल्ह्यात जोर धरण्यास सुरुवात केली आहे. रविवारी कोल्हापुरात सरासरी 12.1 मि.मी. पावसाची नोंद झाली असून राधानगरी तालुक्यातील राधानगरी येथे 43 मि.मी., सरवडेत 37 व कसबा तारळे 47.3 मि.मी. पाऊस झाला आहे. भारतीय हवामान शास्त्र विभागाच्या अहवालानुसार जिल्ह्यात जून महिन्यात 266.1 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. मान्सून यंदा लवकर दाखल झाला होता. मात्र पावसाला जूनची सरासरी गाठता आली नाही. शाहूवाडी, गगनबावडा, भुदरगड, राधानगरी तालुके वगळता इतर तालुक्यांमध्ये पावसाने म्हणावा तसा जोर धरलेला नाही. रविवारी सकाळपासूनच शहरात दिवसभर अधूनमधून पावसाच्या हलक्या सरी कोसळत होत्या. पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला असून कमाल तापमान 28.8 अंश तर किमान तापमान 23.7 अंशांवर होते.

हातकणंगले तालुक्यात सरासरी 2.3 मि.मी., शिरोळ 1.3, पन्हाळा 8.1, राधानगरी 21.9, गगनबावडा 30.4, करवीर 2.3, कागल 8.9, गडहिंग्लज 7.8, भुदरगड 21.8, आजरा 16, चंदगड 20.8 मि.मी. पाऊस झाला आहे. सर्वाधिक पाऊस बांबवडे (ता. शाहूवाडी) 60 मि.मी., आंबा (ता. शाहूवाडी) 66.3, गगनबावडा (ता. गगनबावडा) 44, कडगाव (ता. भुदरगड) 55, गवसे (ता. आजरा) 22.3, हेरे (ता. चंदगड) 26.8 मि.मी. पाऊस झाला.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news