Kolhapur Dairy Farmers 
कोल्हापूर

Kolhapur Dairy Farmers | दूध उत्पादक सावंत बंधूंची अर्थक्रांती; वर्षाकाठी दीड कोटींचे उत्पन्न

Kolhapur Dairy Farmers | कोल्हापूर जिल्ह्यातील गडहिंग्लज तालुक्यातील नूल गावातील सावंत कुटुंबाने दुग्धव्यवसायातून केलेली प्रगती आज संपूर्ण जिल्ह्यात आदर्श ठरत आहे.

पुढारी वृत्तसेवा

Kolhapur Dairy Farmers

कोल्हापूर जिल्ह्यातील गडहिंग्लज तालुक्यातील नूल गावातील सावंत कुटुंबाने दुग्धव्यवसायातून केलेली प्रगती आज संपूर्ण जिल्ह्यात आदर्श ठरत आहे. जिद्द, श्रम आणि कुटुंबातील एकोपा यांच्या जोरावर सावंत बंधूंनी केवळ दोन गायींनी सुरू केलेला छोटासा व्यवसाय आज कोट्यवधींच्या उत्पन्नापर्यंत पोहोचवला आहे.

नूल येथील प्रकाश सावंत आणि बाळासाहेब सावंत यांनी १५–१६ वर्षांपूर्वी दोन गायींपासून दूध व्यवसाय सुरू केला. वेळेनुसार ज्ञान, आधुनिक तंत्रज्ञान आणि योग्य नियोजनामुळे त्यांच्या गोठ्यात आज तब्बल १०८ जनावरे आहेत. ‘गोकुळ दुग्धसंघा’कडे ते रोज ७०० ते ८०० लिटर दूध पुरवतात. या व्यवसायातून त्यांना वर्षाकाठी तब्बल दीड कोटी रुपयांपेक्षा जास्त उत्पन्न मिळते.

या संपूर्ण यशामागे त्यांचे कुटुंबही तितकेच खंबीरपणे उभे आहे. कुटुंबातील १८ जण रोजच्या गोठ्यातील सर्व कामांमध्ये एकत्र राबतात. विशेष म्हणजे, त्यांच्या गोठ्यात एकही बाहेरील कामगार नाही. कुटुंबाची एकजूट आणि सातत्य हाच त्यांच्या यशाचा मोठा पाया मानला जातो.

या यशातून सावंत कुटुंबाने सव्वा कोटी रुपये खर्चून आलिशान बंगला बांधला आहे. कृतज्ञतेच्या भावनेतून या बंगल्यावर सहा फूट उंच गोमातेची प्रतिकृती बसवून त्यांनी दुग्धव्यवसायाबद्दलचा सन्मान व्यक्त केला आहे.

त्यांचा गोठा अत्याधुनिक असून डेअरी क्षेत्रातील आधुनिक मशीनरी, ब्रीडिंग तंत्रज्ञान आणि सुधारित पद्धती अवलंबल्यामुळे त्याला ‘आदर्श गोठा’ हा मानही मिळाला आहे. सावंत कुटुंबाची ही यशोगाथा आज ग्रामीण भागातील अनेक शेतकऱ्यांसाठी प्रेरणादायी ठरते आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT