कोल्हापूर

शिंदे-फडणवीस सरकार कृतघ्न: सत्यजित पाटील यांचा हल्लाबोल

अविनाश सुतार

सरुड (कोल्हापूर) : पुढारी वृत्तसेवा : महाविकास आघाडी सरकारने मंजूर केलेल्या मतदारसंघातील विविध विकासकामांचा निधी रोखण्याचे शिंदे-फडणवीस सरकारने पाप केले आहे. संकटकाळी राज्यातील शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणारे आणि राजकीय सूडबुद्धीने विकासकामांना स्थगिती देत जनतेच्या जखमेवर मीठ चोळणारे हे कृतघ्न सरकार असल्याचा हल्लाबोल माजी आ. सत्यजित पाटील यांनी केला.

राज्य सरकारचे विविध मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने मलकापूर (ता. शाहूवाडी) येथे कोल्हापूर-रत्नागिरी महामार्गावर शुक्रवारी (ता.४) रस्ता रोको आंदोलन करण्यात आले. यावेळी आंदोलकांसमोर बोलताना माजी आ. सत्यजित पाटील यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर जोरदार निशाणा साधला.

माजी आ. सत्यजित पाटील, जिल्हा बँक संचालक रणवीरसिंग गायकवाड यांनी आंदोलनाचे नेतृत्व केले. सुमारे दोन तास रस्ता रोखून धरल्यामुळे रस्त्यावर दुतर्फा चाके ठप्प झालेल्या वाहनांची मोठी रांग लागली होती. शुक्रवारचा आठवडा बाजारही या आंदोलनामुळे प्रभावित झाला. शाहूवाडी पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेत रस्त्यावरील वाहतूक पूर्ववत सुरळीत केली.

पाटील पुढे म्हणाले, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने आणि महाविकास आघाडीतील नेत्यांच्या प्रयत्नांमुळे तालुक्यातील अनेक विकासकामांना भरघोस निधी मिळाला. याच विकासकामांचे आज विद्यमान लोकप्रतिनिधी नारळ फोडत आहेत. मात्र, उद्धव ठाकरे यांचे आभार मानण्याचे किमान औदार्य दाखविण्याची यांना लाज का वाटते. आमदार म्हणून आठ वर्ष काम करत असताना शाहूवाडीत यांच्या कामाचा नेमका काय उजेड पडला, हा संशोधनाचा विषय असल्याचा टोला लगावत आ. विनय कोरे यांच्यावर नामोल्लेख टाळून पाटील यांनी शरसंधान साधले. शासनाने गायरानातील अतिक्रमणाबाबत काढलेला तुघलकी फतवा मोडीत काढण्यासाठी प्रसंगी तीव्र लढा उभा करण्याचा इशारा देत कोणत्याही परिस्थितीत सर्वसामान्य जनतेला बेघर होऊ देणार नाही, अशी सरकारविरोधी आक्रमक भूमिकाही मांडली.

यावेळी रणवीरसिंग गायकवाड, हंबीरराव पाटील, विजय बोरगे, विजय खोत, दत्तात्रय पवार, नामदेव गिरी आदींनी आपल्या मनोगतातून सरकार विरोधी तीव्र भावना व्यक्त केली. पोलीस निरीक्षक प्रकाश गायकवाड, उपनिरीक्षक अनुराधा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. शिवसेना (ठाकरे गट) आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे असंख्य कार्यकर्ते आंदोलनस्थळी उपस्थित होते.

आंदोलकांचा 'मशाल'सह सरकारविरोधात एल्गार

राज्य सरकारने ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, आनंदी शिधा किट तात्काळ घरपोच द्या, मुख्यमंत्री सडक योजनेतील रस्त्याची कामे तातडीने सुरू करा, वीस पटाच्या आतील शाळा बंद करण्याचा निर्णय रद्द करा, खेडोपाड्यातील नळपाणी योजनेच्या कामांची अडवणूक थांबवा, शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर ५० हजार रुपयांचे अनुदान वेळेत द्या, आदी मागण्यांसाठी मशाल हातात घेऊन रस्त्यावर उतरलेल्या आंदोलकांनी सरकारविरोधात एल्गार केला.

हेही वाचलंत का ? 

SCROLL FOR NEXT