महत्वाची बातमी: दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांना परीक्षेचे फॉर्म भरण्यासाठी मुदत वाढ | पुढारी

महत्वाची बातमी: दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांना परीक्षेचे फॉर्म भरण्यासाठी मुदत वाढ

पुणे, पुढारी वृत्तसेवा: महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे फेब्रुवारी-मार्च 2023 मध्ये घेण्यात येणार्‍या दहावी आणि बारावीच्या परीक्षा देऊ इच्छिणार्‍या विद्यार्थ्यांना नियमित शुल्कासह अर्ज भरण्यासाठी मुदतवाढ देण्यात आली आहे. बारावीच्या विद्यार्थ्यांना 15 नोव्हेंबरपर्यंत, तर दहावीच्या विद्यार्थ्यांना 25 नोव्हेंबरपर्यंत नियमित शुल्क देऊन अर्ज भरता येणार आहे, अशी माहिती राज्य मंडळाच्या सचिव अनुराधा ओक यांनी दिली आहे.

फेब्रुवारी- मार्च 2023 च्या परीक्षेस प्रविष्ट होऊ इच्छिणार्‍या नियमित, व्यवसाय अभ्यासक्रम घेणारे, सर्व शाखांचे पुनर्परीक्षार्थी, नाव नोंदणी प्रमाणपत्र प्राप्त झालेले खासगी विद्यार्थी तसेच श्रेणीसुधार योजनेअंतर्गत व तुरळक विषय, औद्योगिक प्रशिक्षण संस्थेद्वारे (आयटीआय) ट्रान्स्फर ऑफ क्रेडिट घेणार्‍या विद्यार्थ्यांचे अर्ज दिलेल्या मुदतीत शाळा, महाविद्यालयांमार्फत ऑनलाइन पद्धतीने “www.mahahsscboard.in’ या संकेतस्थळावर भरायचे आहेत.

बारावीच्या परीक्षेसाठी नियमित शुल्कासह अर्ज करण्याची मुदत 5 नोव्हेंबरला, तर दहावीच्या विद्यार्थ्यांचे अर्ज सरल डेटाबेसवरून भरायची मुदत 10 नोव्हेंबरला संपणार आहे. दहावीची परीक्षा देणार्‍या पुनर्परीक्षार्थी, नाव नोंदणी प्रमाणपत्र प्राप्त झालेले खासगी विद्यार्थी, तसेच श्रेणीसुधार योजनेअंतर्गत व तुरळक विषय घेऊन, आयटीआयद्वारे ट्रान्स्फर ऑफ क्रेडिट घेणार्‍या विद्यार्थ्यांच्या ऑनलाइन पद्धतीने अर्ज भरण्यासाठी 25 नोव्हेंबरची मुदत देण्यात आली आहे. तर माध्यमिक शाळांना चलनाव्दारे बँकेत शुल्क भरण्यासाठी 29 नोव्हेंबर पर्यंत मुदत देण्यात आली आहे. तर प्री-लिस्ट चलनासोबत विभागीय मंडळात जमा करण्यासाठी 1 डिसेंबरची मुदत देण्यात आली आहे.

बारावीसाठी 15 नोव्हेंबरपर्यंत (नियमित शुल्कासह) आणि 16 ते 30 नोव्हेंबर (विलंब शुल्कासह) अर्ज भरण्याची संधी देण्यात आली आहे. तसेच उच्च माध्यमिक शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांनी चलनाद्वारे बँकेत शुल्क भरण्यासाठी 2 डिसेंबरपर्यंत मुदत देण्यात आल्याचे राज्य मंडळाने स्पष्ट केले आहे.

Back to top button