Satej Patil On Jansuraksha Act :
कोल्हापुरात आज इंडिया आघाडीच्या वतीनं जन सुरक्षा विधेयकाच्या विरोधात मोर्चा काढण्यात आला होता. महावीर गार्डनपासून सुरू झालेला हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला. या मोर्चाचं नेतृत्व काँग्रेसचे विधानपरिषदेतील नेते सतेज पाटील यांनी केलं. यावेळी इंडिया आणि महाविकास आघाडीमधील अनेक पक्षांचे जिल्ह्यातील प्रमुख नेते उपस्थित होते. यावेळी जन सुरक्षा कायद्याविरूद्ध जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.
दरम्यान, काँग्रेस नेते सतेज पाटील यांनी पुढारी न्यूजचे कोल्हापूर प्रतिनिधी शेखर पाटील यांना मुलाखत दिली. त्यावेळी ते म्हणाले, 'इंडिया आघाडीच्या वतीनं आज राज्यभर जन सुरक्षा विधेयकाविरूद्ध आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. जन सुरक्षा कायदा हा बहुमताचा गैरवापर करून करण्यात आला आहे. या कायद्यावर लोकांची मते घ्यायला काय हरकत आहे. युएपीए सारखा कायदा देशात अस्तित्वात आहे. त्या कायद्यात बदल सुचवा. मात्र जर तुम्हाला नक्षलवाद्यांविरूद्ध कायदा करायचा असेल तर युएपीए कायद्यात बदल करा असं वक्तव्य सतेज पाटील यांनी केलं.
सतेज पाटील पुढे म्हणाले, 'जन सुरक्षा कायद्याचा वापर हा सामाजिक संघटनांना अडकवण्यासाठी केला जाईल याची शक्यता नाकारता येत नाही. या कायद्याद्वारे जनतेला अडचणीत आणण्याचा सरकारचा अजेंडा दिसतोय.'
नुकत्याच पार पडलेल्या उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीवर देखील सतेज पाटील यांनी भाष्य केलं. ते म्हणाले, 'उपराष्ट्रपती पदाच्या निकालाबाबत आम्ही आत्मचिंतन करू. या निवडणुकीत आम्हाला ४० टक्के मतं पडली आहेत. ज्यांनी निवडणुकीवर बहिष्कार घातला त्यांनी अप्रत्यक्षरित्या भाजपला मदत केली. जी १५ मते बाद झाली ती भाजपची असणार नाहीत कशावरून.... उपराष्ट्रपती निवडणुकीवरून महाविकास आघाडीत कोणतेही मतभेद होणार नाहीत.'