

सतीश सरीकर
कोल्हापूर : कोल्हापूर महापालिकेच्या आगामी निवडणुकीत पहिल्यांदाच प्रभाग रचना बहुसदस्य पद्धतीने झाली आहे. परिणामी महापालिकेची निवडणूक पूर्णपणे बदलणार असून एका प्रभागातून चार चार नगरसेवक निवडून येणार आहेत. आतापर्यंत एक प्रभाग - एक नगरसेवक अशी पद्धत होती. प्रभागाचा नवा चेहरा, उमेदवारांसाठी नवा फेरा ठरणार आहे. पण आता चार नगरसेवक असल्याने राजकीय समीकरणे बदलणार आहेत. उमेदवार, पक्ष, मतदार व स्थानिक पातळीवरील गट-तटबाजी सर्वच या बदलामुळे नव्या दिशेने जाणार आहेत.
भाजप, काँग्रेस, शिवसेना (शिंदे व ठाकरे गट), राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार व शरद पवार गट) यांच्यासह स्थानिक पातळीवरील लहान पक्ष, अपक्ष उमेदवारही या निवडणुकीत उतरतील. मोठ्या पक्षांसाठी : प्रत्येक प्रभागात चार उमेदवार उभे करणे हेच एक मोठे आव्हान आहे. पक्षातील गटबाजी वाढण्याची शक्यता आहे. तिकीट न मिळालेल्यांची नाराजी अपक्ष उमेदवाराच्या रूपाने बाहेर पडू शकते. लहान पक्ष व अपक्ष : बहुसदस्य पद्धतीमुळे लहान पक्ष व अपक्ष उमेदवारांना संधी मिळू शकते. कारण मोठ्या पक्षाचे चारही उमेदवार निवडून येणे कठीण आहे. किमान एक-दोन जागा अपक्ष किंवा लहान पक्ष झटकून घेऊ शकतात.
मोठा प्रभाग, मोठी स्पर्धा : चार नगरसेवक निवडायचे असल्याने मतदार संख्या आणि क्षेत्रफळ दोन्ही वाढले आहे. परिणामी प्रत्येक उमेदवाराला दुप्पट मेहनत घ्यावी लागणार आहे. संघटनेवर भर : एकट्या व्यक्तीच्या प्रभावावर निवडणूक शक्य नाही. उमेदवाराला पक्ष संघटनेच्या बळावर निवडणुकीत उतरणे अपरिहार्य आहे. मतांचे विभाजन : एकाच प्रभागात एकाच पक्षाचे चार उमेदवार असणार. यामुळे मतांचे विभाजन होऊ नये यासाठी नीट समन्वय साधावा लागेल. गटबाजीवर नियंत्रण : स्थानिक गटबाजी, जाती-धर्माचे राजकारण यावर नियंत्रण ठेवून सर्वांना एकत्र घेण्याचे कौशल्य दाखवावे लागणार आहे.