

कोल्हापूर : राजकीय आरोप-प्रत्यारोपांच्या गदारोळात ‘गोकुळ’ संचालकांची संख्या 21 वरून 25 करण्याच्या निर्णयाला सर्वसाधारण सभेने मंगळवारी बहुमताने मंजुरी दिली. संचालिका शौमिका महाडिक यांच्यासह महाडिक गटाने केलेला विरोध डावलून सत्ताधार्यांनी संचालकांची संख्या वाढविण्यात यश मिळविले आहे. अध्यक्षस्थानी ‘गोकुळ’चे अध्यक्ष नविद मुश्रीफ होते. यावेळी सत्ताधारी आणि विरोधक आमने-सामने आल्याने झालेल्या घोषणाबाजीमुळे सभेत गोंधळ झाला. या गोंधळातच पोटनियम दुरुस्तीचा विषय मंजूर करण्यात आला.
‘गोकुळ’मधील संचालकांच्या संख्यावाढीला शौमिका महाडिक यांचा सुरुवातीपासून विरोध असल्यामुळे हा विषय गेल्या काही महिन्यांपासून गाजत आहे. सर्वसाधारण सभेच्या पूर्वसंध्येलाही महाडिक यांनी संचालकांची संख्या वाढविण्यास विरोध असल्याचे सांगून व्यासपीठावर न बसण्याचा निर्णय घेतल्याचे स्पष्ट केले होते. त्यामुळेया सभेकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले होते. सत्तांतर झाल्यानंतरही गोकुळच्या सभेस उपस्थित राहण्याची परंपरा नवीन नेत्यांनीही सुरू ठेवली आहे. परंतु, बदललेल्या राजकीय परिस्थितीमध्ये गोकुळमधील कोणते नेते सभेला उपस्थित राहणार, याबद्दलही उत्सुकता होती.
पंचतारांकित औद्योगिक वसाहतीमधील श्री महालक्ष्मी पशुखाद्य कारखान्यात आयोजित वार्षिक सभेसाठी सकाळपासून गर्दी झाली होती. सभेच्या पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या आरोप-प्रत्यारोपांमुळे मोठा पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. साडेबारा वाजण्याच्या सुमारास मंत्री हसन मुश्रीफ व आ. सतेज पाटील यांचे आगमन झाले. त्यानंतर काही वेळातच संचालिका शौमिका महाडिक यांचे सभासदांसाठी असलेल्या प्रवेशद्वारातून सभास्थळी आगमन झाले. त्यांना पाहून सत्ताधारी गटाच्या समर्थकांनी घोषणा सुरू केल्या. त्यामुळे महाडिक गटाच्या वतीनेही घोषणाबाजीने प्रत्युत्तर देण्यास प्रारंभ झाला. त्यातच अध्यक्ष मुश्रीफ यांचे भाषण सुरू झाले. ते पोटनियम दुरुस्तीवर बोलत असताना महाडिक गटाच्या वतीने याविरोधात जोरदार घोषणा देण्यात आल्या.
या गोंधळातच कार्यकारी संचालक डॉ. योगेश गोडबोले यांनी विषयपत्रिकेवरील विषयांचे वाचन सुरू केले. यावेळी ‘मंजूर... मंजूर...’ करत सभासद प्रतिसाद देत होते. पोटनियम दुरुस्तीचा विषय आल्यानंतर मात्र महाडिक गटाच्या कार्यकर्त्यांनी ‘नामंजूर... नामंजूर...’च्या घोषणा सुरू केल्या. त्यामुळे काही काळ गोंधळ निर्माण झाला. या गोंधळातच संचालक संख्यावाढीचा विषय मंजूर करण्यात आला. संचालक शशिकांत पाटील-चुयेकर यांनी आभार मानले.