Gokul Sangharsh Morcha Kolhapur Pudhari Photo
कोल्हापूर

Gokul Sangharsh Morcha : सत्ता परिवर्तनाची सुरुवात 'संघर्ष भूमी' असणाऱ्या कोल्हापुरातूनच होणार : सतेज पाटील यांचा निर्धार

सहकार कायदा पायदळी तुडवण्याचे सरकारकडून काम, गोकुळ अमूलच्या घशात घालण्याचा डाव

पुढारी वृत्तसेवा

Gokul Sangharsh Morcha Kolhapur : "गोकुळ निवडणुकीचे रणांगण सहा महिन्यांपूर्वी सुरू झाले. गोकुळवर प्रशासक आणू नका, असे आवाहन आम्ही केले होते. मात्र दुर्दैवाने गोकुळवर प्रशासक नियुक्त करण्यात आला. राज्य सरकार सूडबुद्धीने वागत आहे. सहकार कायदा पायदळी तुडवण्याचे काम सरकार करत आहे. गोकुळमध्ये शासन नियुक्त चार संचालकांची नियुक्त करून हे आज सिद्ध झाले आहे. सहकार क्षेत्र मोडून काढण्याचं काम सरकारने सुरू केले आहे," असा आरोप करत सहकार क्षेत्र मोडण्याचे सरकारचे षडयंत्र सुरू आहे, आता २०२९ मधील सत्ता परिवर्तनाची सुरुवात संघर्ष भूमी असणार्‍या कोल्‍हापूरमधून होणार, असा निर्धार काँग्रेस नेते सतेज पाटील यांनी केला. संघर्षमोर्चानंतर कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर झालेल्या जाहीर सभेत ते बोलत होते.

मी समोर येऊन लढतो, तुमच्या सारखं पाठीत खंजीर खुपसत नाही

सहकार सुडबुद्धीने वागत आहे. सहकार कायदा पायदळी तुडवण्याचे काम सरकार करत आहे. हे आज सिद्ध झाले आहे. गोकुळसाठी आम्ही न्यायालयीन लढाई लढली. मात्र त्यावेळी सत्तेत असणाऱ्यांनी कोल्हापूर जिल्ह्यातील दिग्गज नेते मूग गिळून गप्प बसले होते. एकीकडे दिग्गज नेत्यांची फौज होते. तर राजू शेट्टी, गणपतराव पाटील, सत्यजीत पाटील यांनी मला संगर्षाच्या काळात साथ दिली. तुम्ही मला सोडून गेले म्हणून मी घाबरणारा नाही, असेही सतेज पाटील म्हणाले. मी समोर येऊन लढतो, तुमच्या सारखं पाठीत खंजीर खुपसत नाही, असा टोलाही त्यांनी विरोधकांना लगावला.

मी शेतकऱ्यांसाठी लढत होतो, तुम्ही मुलासाठी लढत होता

मी साडेपाच लाख शेतकऱ्यांसाठी मैदानात उतरलो तुम्ही तुमच्या पोराबाळांसाठी निवडणूक लढवली. गोकुळसाठी पायाला भिंगरी लावून फिरलो. तुम्ही मला मी जातीवाद केला नाही. तुम्ही स्वतःचा मुलगा पडला म्हणून चारवेळा बोलला. मग अन्य जातीचे उमेदवार पडले याबाबत का बोलला नाही, असा सवालही सतेज पाटील यांनी उपस्थित केला. चंद्रकांत पाटील आणि हसन मुश्रीफ यांच्यामुळेच आज शासन नियुक्त संचालकांची संख्या वाढली आहे. हे त्यांचेच पाप आहे, असा आरोपही सतेज पाटील यांनी केला.

गोकुळ अमूलच्या घशात घालण्याचा डाव

गोकुळ अमूलच्या घशात घालण्याचा डाव आहे, असा आरोप करत यावेळी सतेज पाटील यांनी गोकुळसाठी शासनाने नियुक्त केलेली चार संचालकांची नावे वाचून दाखवली. यामध्ये शिवाजी दिनकर आडनाईक, डॉ. प्रवीणचंद्र रंगनाथ हेंद्रे, ॲड. प्रशांत भगवान पाटोळे आणि कृष्णात पाटील यांचा समावेश असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच ॲड. प्रशांत भगवान पाटोळे हे सांगली जिल्ह्यातील आहेत. राज्य सरकारला कोल्हापूर जिल्ह्यात एक पात्र सदस्य मिळाला नाही का, असा सवालही त्यांनी केला.

कोल्हापूरकरांनी निर्धार केला की ते होणारच : राजू शेट्टी

यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रमुख राजू शेट्टी म्हणाले की, राज्य सरकार सहकार क्षेत्रात दडपशाहीने कारभार करत आहे. एकीकडे मुख्यमंत्री म्हणतात गोकुळ हा केवळ जिल्ह्यापुरता मर्यादित विषय आहे. तर दुसरीकडे राज्य सरकार शासननियुक्त संचालक करून गोकुळवर ताबा घेण्याचा प्रयत्न सुरू आहे. मात्र आम्ही हा डाव उधळून लावू. कोल्हापूरकरांनी निर्धार केला की ते होणारच हे यापूर्वी टोल आंदोलनात राज्याने पाहिले आहे, असेही राजू शेट्टी म्हणाले. गोकुळ ताब्यात घेऊन ते अमूलला विकण्याचा डाव आहे, असा आरोपही राजू शेट्टी यांनी यावेळी केला.

शासननियुक्त संचालकांना मतदानाचा अधिकार देऊ नका : जयंत पाटील

यापूर्वी सहकारी संस्थांमध्ये केवळ दोन सदस्य शासकीय होते. मात्र आता सतेज पाटलांचे गोकुळमधील बहुमत मोडण्यासाठी सरकारला ४ सदस्य लागले आहेत. देशात न्याय शिल्लक आहे का, असा सवाल उपस्थित होत आहे. सतेज पाटील यांच्याविरुद्ध सर्व होते तरीही ते लढत राहिले. लढणाऱ्यांच्या मागे कोल्हापूर जिल्हा नेहमी उभा असतो हे आजही दिसून आले. लोकांच्या डोळ्यात येईल असे करू नये; आता चार शासननियुक्त संचालक नियुक्त करणार असाल तर करा, मात्र त्यांना मतदानाचा अधिकार देऊ नका, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते जयंत पाटील यांनी केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT