पाणीपुरवठा सुरू करण्यासाठी गेलेल्या सरपंच पतीचा बुडून मृत्यू File Photo
कोल्हापूर

Kolhapur Flood : पाणीपुरवठा सुरू करण्यासाठी गेलेल्या सरपंच पतीचा बुडून मृत्यू

पुढारी वृत्तसेवा

सैनिक टाकळी : पुढारी वृत्तसेवा

अकिवाट तालुका शिरोळ येथील सरपंच वंदना पाटील यांचे पती सुहास पाटील हे पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी जात असताना पाण्यात बुडून त्‍यांचा मृत्यू झाला आहे. पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी ग्रामपंचायतीचे कर्मचारी अरुण कांबळे व सागर माने हे लाइफ जॅकेट परिधान करून पाण्यातून चालत वाट काढत जात होते. त्यावेळी सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास अन्य सात नागरिक ट्रॅक्टर मधून अकिवाट बस्तवाड दरम्यान असणाऱ्या ओतावरील पाण्यातून सकाळी दहा वाजता प्रवास करत होते. यामधील काही नागरिक केळी आणण्यासाठी जात होते. पाण्याच्या प्रचंड वेगाने ट्रॉलीला पाण्यात खेचल्यामुळे ट्रॉली पलटी झाली आणि त्याने ट्रॅक्टरलाही पाण्यात ओढले. त्याचबरोबर ट्रॅक्टर मधील सर्वजण पाण्यात कोसळले.

हे सर्व पाणीपुरवठा कर्मचारी अरुण कांबळे आणि सागर माने यांनी पाहिले व त्यांच्या अंगात लाइफ जॅकेट असल्यामुळे त्यांनी तात्काळ पाण्यात उड्या घेतल्या आणि वाहून जाणाऱ्या आठ जणांपैकी तीन जणांना त्यांनी सुखरूप बाहेर काढले. त्यापैकी दोघे स्वतः पोहोत बाहेर आले. तर दोघांना रेस्क्यू फोर्सच्या मदतीने बाहेर काढण्यात आले. त्यांना तात्काळ पुढील उपचारासाठी रुग्णालयात पाठवण्यात आले.

त्यामध्ये सरपंच पती सुहास पाटील यांचा नाका तोंडात पाणी गेल्याने गुदमरून मृत्यू झाला व एकाची प्रकृती उत्तम असल्याचे सांगितले जात आहे. सुखरूप बचावलेल्यांमध्ये अकीवाट येथील श्रेणिक चौगुले व रोहीदास माने व खिद्रापूर येथील केळी व्यापारी अंगद मोहीते,अझहर आलासे, प्रदीप पाटील यांचा समावेश आहे. पाणीपुरवठा सुरू करण्यासाठी गेलेल्या सरपंच पतीचा मृत्यू झाल्याने गावावर शोककळा पसरली आहे.

प्रशासनाकडून एनडीआरएफ व रेस्क्यू फोर्सच्या माध्यमातून बेपत्ता असणाऱ्या दोघांचे युद्धपातळीवर शोधकार्य सुरू आहे. पण अद्याप दोघे बेपत्ता आहेत. त्यामध्ये माजी जिल्हा परिषद सदस्य इकबाल बैरागदार, माजी सरपंच आण्णासो हसुरे यांचा समावेश आहे. 2005 साली आलेल्या महापुरात नागरिकांना लष्कराच्या बोटीतून स्थलांतरित करीत असताना अशीच घटना राजापूर टाकळी दरम्यान घडली होती. त्यामध्येही दहा जणांना जलसमाधी मिळाली होती. त्यानंतर 2024 साली आलेल्या या महापुरात अकिवाट येथील एकाला आपला प्राण गमवावा लागला आहे. तर दोन बेपत्ता आहेत. यामुळे कृष्णा काठावरील नागरिकांनी महापुराची धास्ती घेतली आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT