Radhanagari Flood
वीज कर्मचाऱ्यांनी पुराच्या पाण्यात पोहत जाऊन वीज वाहिन्या जोडल्या  Pudhari
कोल्हापूर

Radhanagari Flood : महापुराच्या पाण्यात पोहत जाऊन केली वीज वाहिन्यांची जोडणी

स्वालिया न. शिकलगार

धामोड (राधानगरी) : गेला आठवडाभर संपूर्ण जिल्ह्याला महापुराचा वेढा पडला आहे. अनेक मार्ग बंद झाल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे. आपत्ती निवारण विभाग अहोरात्र कष्ट घेताना दिसत आहे. यामध्ये वीज वितरण विभागाचे योगदान मोठे आहे. वेळुचे बेट व पुरातून वाहून आलेले मोठा वृक्ष वीजवाहिन्यांमध्ये अडकल्यामुळे सुमारे ५० हून अधिक गावांचा वीजपुरवठा खंडीत झाला होता. या महापुरात स्वतःचा जीव धोक्यात घालून वीजवाहिन्यांची जोडणी करणाऱ्या वीज कर्मचाऱ्यांचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आणि त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. (Radhanagari Flood)

राधानगरी धरण भरल्यामुळे भोगावती नदीला मोठा पूर आला आहे. कोथळी येथून राधानगरी तालुक्यातील धामोड व आवळी उपकेंद्राना वीज पुरवठा करणाऱ्या वीज वाहिन्यांवर  घोटवडे येथे भले मोठे वेळूचे बेट कोसळले. तर आवळी येथे नदीच्या मध्यभागी भला मोठा वृक्ष वीज वाहिन्यांमध्ये अडकला. राधानगरी तालुक्यातील ५० हून अधिक गावे अंधारात गेली.

वीज पुरवठा पुर्ववत करण्यासाठी लाईनमन युवराज चौगले, चंद्रकांत भोई, सागर पाटील, शिवाजी कांबळे, नेताजी कुंभार यांच्यासह पंधरा कर्मचारी चार फूट पाण्यातून सुमारे दिड किमी. पायी चालत जाऊन आणि अर्धा किमी. नदीपात्रात पोहत गेले. वृक्ष तोडून, तुटलेल्या वीजवाहिन्या जोडल्या. घोटवडे येथील वेळुचे बेट तोडून वीजपुरवठा सुरू केला.

मुसळधार पाऊस आणि महापुरात स्वतःच्या जीवाची पर्वा न करता सकाळी सहा ते सायंकाळी अंधार पडेपर्यंत, उपाशी पोटी राहुन कर्तव्य बजावलेल्या वीज वितरणच्या कर्मचाऱ्यांचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला. त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव सुरू झाला आहे.

SCROLL FOR NEXT