कासारवाडी (कोल्हापूर) : वारणा नदीला आलेल्या पुराने हातकणंगले तालुक्यातील निलेवाडी गावाला चारी बाजूने पाण्याचा वेढा बसला आहे. गावातून बाहेर येणारे जाणारे रस्ते पाण्याखाली गेले आहेत. यामुळे नागरिकांनी स्थलांतर केले आहे तर प्रशासनाने त्यांची सोय केली आहे.
वारणा नदीच्या पाण्यात चांदोली धरणातून सोडण्यात येणारा विसर्ग व सुरू असलेलला मुसळधार पावसामुळे पाणी पातळी वाढतच आहे. बुधवारी रात्रीपासून नागरिकांनी जनावरांसह स्थलांतर करण्यास सुरुवात केली आहे. गावातील ४७५ कुटुंबांनी स्थलांतर केले आहे. यातील १७२९ नागरिकांनी नातेवाईकांकडे स्थलांतर केले आहे. अजूनही काही नागरिक गावात आहेत. तर प्रशासनाने विलासराव कोरे इंटरनॅशनल स्कूलमध्ये २१४ नागरिकांचे निवारागृहात सोय केली आहे. त्यांना आवश्यकतेनुसार जीवनावश्यक वस्तू ,जेवण, आरोग्य विभागातर्फे त्यांना आवश्यक त्या तपासण्या व औषधे पुरवले जात आहेत.
येथील ११६० जनावरांचे स्थलांतर झाले आहे. जनावरांची ही निवारा शेडमध्ये व्यवस्था करण्यात आली आहे. येथे गटविकास अधिकारी, तहसीलदार, यांनी भेटी देऊन पाहणी केली आहे. तर ग्रामसेविका अनुपमा सिद्धनाळे, आरोग्य कर्मचारी तळ ठोकून आहेत.