Ghungur Savrewadi Public Hearing
बांबवडे : घुंगूर - सावरेवाडी (ता. शाहूवाडी) येथे भैरवनाथ अर्थमूव्हर्स अँड कंपनीच्या वतीने गट क्रमांक ६८५, व १४.२४ हेक्टर वन जमिनीवरील व वार्षिक १ लाख ८० हजार टन उत्पादन क्षमता असणाऱ्या नियोजित प्रकल्पाबाबत जनसुनावणी आज (दि.२६) सकाळी साडेदहा वाजता झाली. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या वतीने झालेल्या या सुनावणीला अप्पर जिल्हाधिकारी संजय तेली, प्रांताधिकारी समीर शिंगटे, उपप्रादेशिक अधिकारी प्रमोद माने, प्रादेशिक अधिकारी जयंत हजारे, नायब तहसीलदार गणेश लव्हे आदी उपस्थित होते.
यावेळी सामाजिक कार्यकर्ते, पर्यावरण प्रेमी, राजकीय व सामाजिक कार्यकर्त्यांच्या सह पंचक्रोशीतील नागरिकांनी यामध्ये सहभाग नोंदवला. स्थानिक ग्रामस्थांनी या प्रकल्पामुळे ग्रामीण, डोंगराळ भागातील विकासाला चालना मिळून बेरोजगार युवकांच्या हाताला काम मिळेल, असे मत व्यक्त केले. तर काहींनी पर्यावरणाचा ऱ्हास होईल, असा प्रश्न उपस्थित केला.
यावेळी अपर जिल्हा अधिकारी संजय तेली म्हणाले की, आजच्या या सुनावणीमध्ये अतिशय पारदर्शक पद्धतीने जन सुनावणी घेतली. पंचक्रोशीतील नागरिक, गावकरी महिला यांनी आपला सहभाग नोंदवला. या जन सुनावणीचे व्हिडिओ रेकॉर्डिंग करण्यात आले आहे. आम्ही सगळ्यांच्या भावना ऐकल्या. या बाबतचा संपूर्ण अहवाल आम्ही एक दोन दिवसांत शासन स्तरावर पाठवू.
यावेळी कंपनी भागीदार युवराज पाटील म्हणाले की, देशाच्या विकासामध्ये खनिजाचे महत्त्व अत्यंत महत्त्वाचा आहे. हा प्रकल्प झाला तर ग्रामीण भागातील व पंचकोशीतील लोकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील. त्यातून मिळालेल्या रॉयल्टीतून विकासाची कामे करता येतील. तरुणांना काम आणि या भागाचा विकास या दृष्टिकोनातून ही कंपनी शासनाच्या अटी शर्तीची पूर्तता करून लवकरच सुरू होईल.
यावेळी जिल्हा बँकेचे संचालक रणवीर गायकवाड, माजी उपसभापती महादेवराव पाटील, ए. वाय. पाटील, तानाजी रवंदे, मानसिंग सावरे, संदीप केसरकर, सरपंच शुभांगी कांबळे, कल्पना पाटील, माजी सरपंच बाजीराव सावरे, पांडुरंग खोत उपस्थित होते. डीवायएसपी आप्पासो पवार, शाहूवाडीचे पोलीस निरीक्षक विजय घेरडे व अभिजीत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली बंदोबस्त ठेवला होता.