

कोल्हापूर : जम्मू-काश्मीर येथे अडकलेले जिल्ह्यातील 200 हून अधिक पर्यटक सुरक्षित आहेत. या सर्व पर्यटकांशी जिल्हा प्रशासनासह त्यांच्या नातेवाईकांचा संपर्क झाला आहे. यापैकी 66 हून अधिक पर्यटक मंगळवारी प्रत्यक्ष हल्ला झाला, त्या पहलगाम परिसरातील हॉटेल्समध्ये सुखरूप असल्याचे जिल्हा प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले.
पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यानंतर जिल्हा प्रशासन अलर्ट झाले आहे. जम्मू-काश्मीरमध्ये पर्यटनासाठी तसेच अन्य कारणांसाठी गेलेल्या पर्यटक, नागरिकांची माहिती द्या, असे आवाहन करत याकरिता जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्षात हेल्पलाईन सुरू करण्यात आली आहे. जिल्ह्यातील विविध भागातून, विविध खासगी टूर ऑपरेटर संस्थाकडून 200 हून अधिक नागरिक पर्यटनासाठी जम्मू-काश्मीरला गेले आहेत. मंगळवारी झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये अलर्ट जारी करण्यात आला. यामुळे काही पर्यटक आहे त्याच ठिकाणी अडकले. मात्र, हे सर्व पर्यटक सुखरूप असून, स्थानिक प्रशासनाकडून त्यांची सर्व प्रकारची काळजी घेतली जात आहे. जिल्हा प्रशासन स्थानिक प्रशासनाच्या संपर्कात असून, पर्यटकांना आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्याबरोबरच त्यांच्या परतीच्या प्रवासासाठी मदत केली जात आहे. जम्मू-काश्मीरमध्ये पर्यटनासाठी कोल्हापूर जिल्ह्यातून सुमारे 200 पर्यटक गेले आहेत. मात्र, हे सर्व पर्यटक सध्या श्रीनगर व पहलगाम परिसरात असून, ते सर्व सुरक्षित आहेत. यापैकी बहुतांशी पर्यटक परतीच्या मार्गावर असून, गुरुवारी कोल्हापूरच्या दिशेने रवाना होत असल्याचे सांगण्यात आले.
पहलगाम, जम्मू-काश्मीर येथे पर्यटकांवर दहशतवादी हल्ला झाला आहे. यामध्ये राज्यातील काही पर्यटक असण्याची शक्यता आहे. या ठिकाणी कोल्हापूर जिल्ह्यातील कोणी व्यक्ती असल्यास किंवा आपल्या ओळखीतील कोणी नातेवाईक किंवा व्यक्ती असल्यास तत्काळ जिल्हा प्रशासनास, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या +918275121077 या क्रमांकावर संपर्क करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.