कोल्हापूर

कोल्हापूर : किणी टोल वसुलीविरोधातील आंदोलनापूर्वीच मनसे कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात

अनुराधा कोरवी

किणी; पुढारी वृत्तसेवा : मुदत संपूनही सुरू असलेली पुणे- बंगळूर राष्ट्रीय महामार्गावरील टोल वसुली तातडीने बंद करावी, या मागणीसाठी मनसे वाहतूक सेनेच्या वतीने पुकारण्यात आलेले आंदोलन पोलिसांनी दडपले. आंदोलनासाठी आलेल्या शेकडो कार्यकर्त्यांना ताब्यात घेण्यात आले.

महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडून राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाकडे कोल्हापूर जिल्ह्यातील किणी व सातारा जिल्हयातील तासवडे हे दोन्ही टोलनाके २४ जूनच्या मध्यरात्री हस्तांतरीत करण्यात आले. मुदत संपली असतानाही टोल वसूली सुरू करण्यात आली. या टोलसाठी सहा पदरीकरणाचे कारण सांगण्यात येत आहे; पण सहा पदरी झालेलाच नाही. तसेच आतापर्यंत केलेल्या खर्चाचा व वसुलीचा हिशोब न देता वाहनधारक जनतेला लुटण्याचे काम ठेकेदार, केंद्र व राज्य शासनाचे अधिकारी यांच्या संगनमताने सुरू आहे. या भ्रष्टाचाराची सीबीआय चौकशी झालीच पाहिजे, अशी मागणी करीत महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेनेचे जिल्हाध्यक्ष राजू जाधव यांच्या नेतृत्वाखालील आज दुपारी एक वाजण्याच्या सुमारास शेकडो मनसैनिक प्रचंड घोषणाबाजी करत किणी टोल नाक्याजवळ आले.

याच दरम्यान आंदोलक मोठ्या संख्येने किणी टोल नाक्यावर येणार असल्याची माहिती मिळाल्याने पोलिसांनी प्रचंड फौजफाटा तैनात केला होता. जलद कृतिदलाच्या तीन तुकड्यांसह वडगांव, हातकणंगले, जयसिंगपूर येथील पोलीस अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने तैनात करण्यात आले होते. आंदोलकांना नाक्यापासून दूरच रोखण्यासाठी पोलीस प्रशासनाने व्युव्हरचना आखली होती, आंदोलकाना पांगवण्यासाठी अश्रूधुराच्या नळकांड्या, अग्निशमन दल अशी जय्यत तयारी करण्यात आली होती.

वाठार येथे जमलेले कार्यकर्ते दुपारी एक वाजण्याच्या सुमारास मनसेच्या वाहतूक सेनेचे जिल्हाध्यक्ष राजू जाधव यांच्या नेतृत्वाखाली मोटर सायकल, चारचाकी वाहने व बसमधून रॅलीने किणी येथे आले. मात्र, टोल नाक्याच्या मागेच पोलिसांनी आंदोलकांना अडवले. राष्ट्रीय राजमार्ग प्राधीकरणाचे प्रकल्प संचालक वसंत पंदरकर यांच्या निषेधार्थ तिरडी मोर्चा काढण्यासाठी आणलेली तिरडी अगोदरच पोलिसांनी कार्यकर्त्यांकडून काढून घेतल्याने वातावरणात काही काळ तणाव निर्माण झाला हाेता.

वडगाव पोलीस ठाण्याचे निरीक्षक भैरवनाथ तळेकर यांचेशी तिरडी काढून घेतल्याबद्दल वाद सुरू असताना काही क्षणांतच पोलीस बळाचा वापर करत राजू जाधव यांच्यासह प्रमुख महिला व पुरुष कार्यकर्त्यांना उचलून पोलीस व्हॅनमध्ये घातले.  टोल वसुली थांबलीच पाहिजे, वाहनधारकांची लूट थांबलीच पाहिजे ,अशा घोषणांनी कार्यकर्त्यांनी परिसर दणाणून सोडला, मात्र, सर्वच आंदोलककर्त्यांना पोलिसांनी धरपकड करत त्यांना वडगांव पोलीस ठाण्यात नेले. आंदोलनासाठी प्रवीण माने, संजय पाटील, नयन गायकवाड, फिरोज मुल्ला, सुनील लोखंडे यांच्यासह शेकडो महिला व पुरुष कार्यकर्ते उपस्थित होते.

आंदोलन करण्यासाठी प्रशासनाची परवानगी घेऊनही लोकशाही मार्गाने होणारे आंदोलन पोलिसांनी का होवू दिले नाही?. कोणतेही नुकसान कलेले नव्हते तरीही आंदोलनाआधीच पोलिसांनी का कारवाई केली? असे सवाल राजू जाधव यांनी केला. बेकायदेशीररित्या सुरू असणारा टोल नाका बंद केल्याशिवाय मनसे स्वस्थ बसणार नाही,  असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.

हेही वाचा? 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT