दापोडी : गृहपाठ बंदमुळे विद्यार्थ्यांचे नुकसान होणार? | पुढारी

दापोडी : गृहपाठ बंदमुळे विद्यार्थ्यांचे नुकसान होणार?

दापोडी : पुढारी वृत्तसेवा: शिक्षण मंत्र्यांच्या विचाराधीन असलेल्या गृहपाठ बंदच्या निर्णयामुळे शाळकरी विद्यार्थ्यांचे नुकसान होणार असाच एकंदरीत सूर दिसून येत आहे. मुलांची लेखन-वाचनाची सवय बंद होईल. तसेच, विद्यार्थांच्या आभ्यासावर विपरीत परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. सद्यस्थितीतील शाळकरी मुलांचे कोरोना महामारीमुळे दोन वर्ष नुकसान झाले आहे. मुलांना मोबाईलची गोडी व मैत्री झाली आहे. त्यातच जर गृहपाठ बंद केला तर विद्यार्थ्यांच्या अभ्यासावर परिणाम होणार आहे. लेखन आणि वाचन या दोन्ही गोष्टीवर गृहपाठ बंदमुळे परिणाम होणार आहे. विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास हा गृहपाठावर अवलंबून असतो आणि गृहपाठ बंद केला तर घरातील मिळणारा रिकामा वेळ हा वायफट जाईल. त्यामुळे मुलांची अभ्यासाची गोडी कमी होईल.

इयत्ता पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांचा गृहपाठ बंद करण्याचा निर्णय राज्य सरकारच्या विचाराधीन आहे. लवकरच यावर तज्ज्ञांशी चर्चा करून निर्णय घेण्यात येणार असल्याची माहिती शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी दिली आहे. विद्यार्थ्यांचा गृहपाठ बंद करण्याबाबत उपनगरातील पालक आणि शिक्षक यांनी नाराजी व्यक्त केली आहे. गृहपाठ बंदमुळे विद्यार्थ्यांचे नुकसान होणार असल्यामुळे तो पूर्वीप्रमाणेच सुरू ठेवण्याची मागणी केली आहे.

पिंपळे गुरव : राज्य सरकारकडून आढावा बैठकीत शाळेच्या अभ्यासावर लक्ष केंद्रित करण्याकरिता तसेच शालेय मुलांना अतिरिक्त तणावाचा बोजा कमी होण्याचा उद्देश गृहपाठ बंद करण्यावर विचार केला जात आहे. यावर पिंपळे गुरव परिसरातील पालक व शिक्षकांनी गृहपाठ सुरू ठेवण्याची भूमिका घेतली आहे. तसेच, गृहपाठ बंद केल्यास विद्यार्थ्यांचे नुकसान होणार असल्याचे सांगितले.

 

सद्यस्थितीत बालभारतीकडून पाचवी ते आठवीच्या मुलांना दरवर्षी पुस्तके पुरविली जातात. जर पुस्तकांमध्येच प्रत्येक पाठांतर दोन पाने वह्यांची जोडून अशी जर पुस्तके छापली तर ते पुस्तक पुनर्वापरासाठी वापरता येणार नाही. त्यामुळे गरीब मुलांचे यामध्ये नुकसान होणार आहे. एका विद्यार्थ्याने एकदा पुस्तक वापरल्यानंतर ते पुस्तक पुन्हा नवीन विद्यार्थ्यांच्या वापरासाठी अयोग्य ठरणार आहे. त्यामुळे हा निर्णय शिक्षण विभागाच्या व विद्यार्थ्यांच्या दृष्टीने नुकसानकारकच आहे.
– कल्याणी कुलकर्णी, प्राचार्या, स्वामी विवेकानंद विद्यामंदिर दापोडी

शाळेत शिक्षकांनी दिलेला अभ्यास विद्यार्थी घरी आल्यानंतर पूर्ण करीत होते. मात्र, गृहपाठ बंद केला तर शाळेच्या व्यतिरिक्त अभ्यास मुले बंद करतील. यातून मुलांचेच नुकसान होईल. शिक्षकांनी अभ्यास नाही दिला तर घरी मुले अभ्यास करणार नाहीत. त्यामुळे गृहपाठ बंद करणे हे अयोग्य आहे.

– अंजुषा इंगवले, पालक, दापोडी

पहिली, दुसरी इयत्तेतून आलेल्या मुलांचा लिखाण व वाचनाचा सराव बंद झाला आहे. कोरोनामुळे दोन वर्ष अभ्यास बंद पडल्यामुळे दुसरी, तिसरीतील विद्यार्थी एकदम पाचवीच्या वर्गात आल्यामुळे त्या विद्यार्थ्यांना स्वतःचे नाव सुद्धा लिहिता येत नाही. त्यामुळे घरी दिलेला अभ्यास जर बंद केला तर मुलांचे नुकसानच होणार आहे. घरी अभ्यास करण्याची सवय मुलांची बंद होईल.
– बाळासाहेब भोसले,  शिक्षक, दापोडी

Back to top button