पिंपरी : सावधान पुढे धोका आहे! शहर परिसरातून जाणार्‍या महामार्गावर 16 ठिकाणी अपघातांचे ‘ब्लॅक स्पॉट’ | पुढारी

पिंपरी : सावधान पुढे धोका आहे! शहर परिसरातून जाणार्‍या महामार्गावर 16 ठिकाणी अपघातांचे ‘ब्लॅक स्पॉट’

संतोष शिंदे : 

पिंपरी : टाटा समूहाचे माजी अध्यक्ष सायरस मिस्त्री यांचा मुंबईजवळील पालघर येथे नुकताच अपघाती मृत्यू झाला. या घटनेमुळे उद्योगक्षेत्र ढवळून निघाले. या अपघाताची देशपातळीवर दखल घेण्यात आली. केंद्रीय रस्ते व वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी कारमध्ये प्रवास करणार्‍या प्रत्येकाला सीटबेल्ट लावणे बंधनकारक केले. या पार्श्वभूमीवर पिंपरी-चिंचवड वाहतूक विभागानेदेखील आपल्या हद्दीतून जाणार्‍या महामार्गावरील अपघातांचे सोळा ‘ब्लॅक स्पॉट’ निश्चित केले आहेत. यातील काही ठिकाणी उपाययोजना करण्यात आल्या आहेत. तर, काही ठिकाणी संबंधित विभागाकडून पूर्तता करून घेण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. मात्र, तरीदेखील येथून जाताना जपूनच जावे लागणार आहे. कारण, पुढे धोका आहे.

असे ठरवतात  ‘ब्लॅक स्पॉट’
राष्ट्रीय महामार्ग, राज्य महामार्ग अथवा जिल्ह्यातील इतर मुख्य रस्त्यावर सुमारे 500 मीटर अंतरामध्ये सलग तीन वर्षांत पाच जणांचा मृत्यू किंवा गंभीर अपघात झाल्यास त्या ठिकाणास ‘ब्लॅक स्पॉट’ म्हणून निश्चित केले जाते. तसेच, दहा व्यक्तींचा (एक किंवा एकापेक्षा जास्त अपघातात) अपघाती मृत्यू झाला असल्यास संबंधित ठिकाण ‘ब्लॅक स्पॉट’ म्हणून निश्चित करण्यात येते.

शहर परिसरातून जाणार्या महामार्गावर जास्त प्रमाणात अपघात होणारी सोळा ठिकाणे ‘ब्लॅक स्पॉट’ म्हणून निश्चित करण्यात आली आहेत. या ठिकाणी होणारे अपघात रोखण्यासाठी उपायोजना करण्यात आल्या आहेत. तसेच, काही ठिकाणी संबंधित विभागाशी पत्रव्यवहार करून पाठपुरावा सुरू आहे. बहुतांश अपघात अतिवेगामुळे होत आहेत, त्यामुळे वाहनचालकांनी सावकाश वाहने चालवण्याची गरज आहे.
– आनंद भोईटे, पोलिस उपायुक्त,  वाहतूक विभाग.

 

साबळेवाडी
ठिकाण : चाकण वाहतूक विभागाच्या अखत्यारितील चाकण- शिक्रापूर महामार्गावर.
अपघाताचे कारण : राज्य महामार्ग अरुंद असल्याने वारंवार अपघात.
अपघात रोखण्यासाठी उपाययोजना ः रस्तारुंदीकरण गरजेचे आहे. त्यासाठी संबंधित विभागाला पत्रव्यवहार, रस्ता दुभाजक उभारले, वाहतूक नियमनासाठी अंमलदार नियुक्त.

चिंबळी फाटा
ठिकाण : चाकण वाहतूक विभागाच्या अखत्यारित पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गावर
अपघाताचे कारण ः रस्त्यावरील खड्डे व सिग्नलचा अभाव.
उपाययोजना ः सिग्नल बसवण्यासाठी पत्रव्यवहार, नियमनासाठी वॉर्डन व कर्मचारी तैनात, चौकालगतचे अतिक्रमण काढले.

कुरुळी फाटा
ठिकाण : चाकण वाहतूक
विभागाच्या अखत्यारित पुणे- नाशिक राष्ट्रीय महामार्गावर.
अपघाताचे कारण – सिग्नलचा अभाव.

उपाययोजना : सिग्नल बसवण्यासाठी पत्रव्यवहार, साईटपट्ट्या आणि खड्डे बुजवले, अतिक्रमण हटवून चौक मोकळा केला.
चाकण-तळेगाव चौक
ठिकाण : चाकण विभागाच्या अखत्यारित पुणे नाशिक राष्ट्रीय महामार्गाला जोडणारा चौक

अपघाताचे कारण  एमआयडीसीतील अवजड वाहनांची वर्दळ, सायंकाळी रस्ता ओलांडणार्‍या कामगारांची गर्दी
उपाययोजना : लेफ्ट टर्न फ्री केला, दुभाजक उभारले, मुंबईकडे जाणारी वाहतूक माणिक चौकातून स्पायसर चौकाकडे वळवली, रिक्षा व बसथांबा दोनशे मीटर हलवला

लडकत पेट्रोल पंप
ठिकाण : देहूरोड विभागाच्या अखत्यारित पुणे-मुंबई महामार्गावर.
अपघाताचे कारण : वाहनांचा अतिवेग.
उपाययोजना : अपघात प्रवणक्षेत्र, सूचना फलक लावण्यासाठी पत्रव्यवहार, रस्त्यावर रम्बलिंग स्ट्रीप, ब्लिंकर आणि पांढरे पट्टे मारले; बारा तास कर्मचारी नियुक्त.

सेंट्रल चौक
ठिकाण ः देहूरोड विभागाच्या अखत्यारीत पुणे-मुंबई महामार्गावर
अपघाताचे कारण ः वाहनांचा अतिवेग
उपाययोजना ः अपघात प्रवण क्षेत्र, सूचना फलक लावण्यासाठी पत्रव्यवहार, रम्बलिंग स्ट्रीप, ब्लिंकर आणि पांढरे पट्टे मारले. बारा तास कर्मचारी नियुक्त

शिंदे पंप
ठिकाण ः देहूरोड विभागाच्या अखत्यारीत पुणे-मुंबई महामार्गावर
अपघाताचे कारण ः अनधिकृत पंक्चर्स आणि वाहनांचा अतिवेग
उपाययोजना : वाहनचालकांसाठी सूचनाफलक लावण्यासाठी पत्रव्यवहार, रस्त्यावर रम्बलिंग स्ट्रीप, पेट्रोल पंपाचा कर्मचारी बारा तास नियुक्त.

तळेगाव रेल्वे स्टेशन
ठिकाण ः तळेगाव वाहतूक विभागाच्या अखत्यारीत तळेगाव-चाकण महामार्ग
अपघाताचे कारण ः वाहनांचा वेग आणि कायम वर्दळ
उपाययोजना ः तळेगाव दाभाडेगावात जाणारा लेफ्ट टर्न फ्री, बस थांबा हलवला, झेब्रा पट्टे मारले

खालुंब्रे

ठिकाण ः महाळुंगे वाहतूक विभागाच्या अखत्यारीत तळेगाव-चाकण-शिक्रापूर महामार्ग
अपघाताचे कारण ः अरुंद रस्ता आणि वाहनांचा अतिवेग
उपाययोजनाः साईटपट्ट्या भरल्या, रस्त्यावरील अतिक्रमण काढले.

वाकडनाका
ठिकाण ः हिंजवडी वाहतूक विभागाच्या अखत्यारीत मुंबई- बंगळूर महामार्ग
अपघाताचे कारण ः नागरिक रस्ता ओलांडतात, वाहनांचा अतिवेग
उपाययोजना ः खड्डे बुजवले, पंक्चर बंद केले, अंमलदार व वॉर्डन नियुक्त, बसथांबा हलवण्यासाठी पत्रव्यवहार

सुतारवाडी-बावधन
ठिकाण ः हिंजवडी वाहतूक विभागाच्या अखत्यारीत मुंबई- बंगळूर महामार्ग
अपघाताचे कारण ः वाहनांचा अतिवेग
उपाययोजना ः पत्रा दुभाजक लावला, लाईटचे दिवे सुरू केले. सूचना फलक आणि सीसीटीव्हीसाठी पत्रव्यवहार

पुनावळे (नदी पूल)
ठिकाण ः हिंजवडी वाहतूक विभागाच्या अखत्यारीत मुंबई- बंगळूर महामार्ग
अपघाताचे कारण ः रस्त्यावरील खड्डे, वाहनांचा अतिवेग
उपाययोजना ः खड्डे बुजवले, सूचना फलकसाठी पत्रव्यवहार

बोराडेवस्ती
ठिकाण ः भोसरी वाहतूक विभागाच्या अखत्यारीत पुणे-नाशिक महामार्ग
अपघाताचे कारण ः सिग्नल नसल्याने व रस्त्याला तीव्र उतार असल्याने
उपाययोजना : अपघात प्रवणक्षेत्र असे फलक आणि गतिरोधक उभारले

किवळे ब्रिज
ठिकाण ः देहूरोड वाहतूक विभागाच्या अखत्यारीत मुंबई-बंगळूर महामार्ग
अपघाताचे कारण ः रस्त्यावरील खड्डे आणि अतिवेग
उपाययोजना ः संबंधित विभागाशी पत्रव्यवहार

सोमाटणे फाटा
ठिकाण ः देहूरोड वाहतूक विभागाच्या अखत्यारीत पुणे-मुंबई महामार्ग
अपघाताचे कारण ः वाहनांची वर्दळ आणि अतिवेग
उपाययोजना ः संबंधित विभागाशी पत्रव्यवहार, खड्डे बुजवले

भक्ती-शक्ती चौक
ठिकाण – निगडी वाहतूक विभागाच्या अखत्यारीत पुणे-मुंबई महामार्ग
अपघाताचे कारण ः वाहने आणि पादचार्यांची वर्दळ
उपाययोजना ः भक्ती-शक्ती उड्डाण पूल झाल्यापासून अपघात घटले.

Back to top button