सुभाष पाटील
विशाळगड : ऐतिहासिक पावनखिंड आणि विशाळगडकडे जाणारा पांढरेपाणी ते पावनखिंड हा मार्ग सध्या प्रवाशांसाठी 'मृत्यूचा सापळा' बनला आहे. रस्त्याची दुरुस्ती केल्याचा दावा करणाऱ्या संबंधित विभागाने काही दिवसांपूर्वीच घाईगडबडीत मलमपट्टी केली. परंतु ही दुरुस्ती प्रवाशांचा दिलासा ठरण्याऐवजी त्यांच्या अडचणीत वाढ करणारी ठरली आहे. 'या दुरुस्तीपेक्षा पहिलीच बरी होती परिस्थिती,' अशी संतप्त प्रतिक्रिया सध्या वाहनचालक आणि प्रवासी व्यक्त करत आहेत.
पावसाळ्याची सुरुवात झाल्यापासूनच या रस्त्याची अक्षरशः चाळण झाली होती. 'दैनिक पुढारी'ने यावर आवाज उठवल्यानंतर खडबडून जागे झालेल्या विभागाने केवळ खडी आणि मुरुम टाकून खड्डे बुजविण्याचा प्रयत्न केला. पण ही मलमपट्टी तात्पुरती ठरली. काही दिवसांतच टाकलेली खडी उखडली आणि रस्ता पुन्हा एकदा खड्डेमय झाला आहे. त्यामुळे हा रस्ता दुरुस्त केला की अधिक खराब केला, असा प्रश्न आता विचारला जात आहे.
पावनखिंड आणि विशाळगड ही लोकप्रिय पर्यटन स्थळे असल्याने या मार्गावर नेहमीच पर्यटकांची वर्दळ असते. मात्र, रस्त्याची ही बिकट अवस्था पाहता पर्यटकांना सुरक्षित परतण्याची खात्री देणे अवघड झाले आहे. पाण्याने भरलेले मोठमोठे खड्डे आणि उखडलेली खडी यामुळे अपघातांचे प्रमाण वाढले आहे. अनेकदा वाहनचालकांना तारेवरची कसरत करावी लागते.
यामुळे, प्रशासकीय विभागाच्या कामावर तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. केवळ वरवरची मलमपट्टी करून प्रवाशांच्या जिवाशी खेळण्याचा हा प्रकार कधी थांबणार? असा सवाल स्थानिक नागरिक आणि प्रवासी विचारत आहेत. या रस्त्याची खऱ्या अर्थाने दुरुस्ती कधी होणार, की प्रवाशांना याच खड्डेमय आणि जलमय रस्त्यावरून प्रवास करावा लागणार?.