Kolhapur Ambabai Temple 
कोल्हापूर

Ambabai Temple Kolhapur | अंबाबाई दर्शनासाठी दीड लाखावर भाविक

Ambabai Temple Kolhapur | एका दिवसात गर्दीचा उच्चांक; सात दिवसांत 10 लाखांचा टप्पा

पुढारी वृत्तसेवा

कोल्हापूर : पुढारी वृत्तसेवा
शरदीय नवरात्रोत्सवाच्या सातव्या दिवशी रविवारी करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिरात भाविकांच्या गर्दीचा उच्चांक नोंदविण्यात आला. रविवारीची सुट्टी आणि नवरात्रोत्सव यांचा योग साधत पहाटेपासूनच दर्शनासाठी भाविकांचा महापूर लोटला. दिवसभरात दीड लाखांहून अधिक भाविकांनी देवीचे दर्शन घेतले, तर घटस्थापनेपासून सात दिवसांत दर्शन घेणाऱ्या भाविकांची संख्या दहा लाखांच्या घरात पोहोचली आहे.

वाढत्या गर्दीमुळे मुख्य दर्शन मंडप, मुखदर्शन रांग आणि शेतकरी बाजार येथील दर्शन मंडप दिवसभर भाविकांनी फुलून गेले होते. रविवारी पहाटे साडेपाच वाजल्यापासून परगावाच्या भाविकांनी मंदिराकडे धाव घेतली. लवकर दर्शन मिळावे यासाठी अनेक भाविकांनी रात्री दोन ते अडीच वाजल्यापासूनच मंदिर आवारात हजेरी लावली होती.
सकाळी अकराच्या सुमारास मुख्य दर्शन मंडप, दर्शन रांग आणि शेतकरी बाजार परिसरातील दर्शन मंडप पूर्ण भरून गेले होते. दर्शन रांगा मंडपाबाहेरपर्यंत पोहोचल्या होत्या. मुखदर्शनासाठीची रंगही सात ते आठ फेऱ्यांमध्ये लागली होती. उन्हाचा तडाखा असूनही भाविकांचा उत्साह कायम होता.

दर्शनासाठी प्रतीक्षा करावी लागत असतानाही भाविकांची गर्दी कमी होत नव्हती. रात्री उशिरापर्यंत मंदिर परिसर भाविकांचा ओघ सुरूच होता. महाराष्ट्रासह गुजरात, गोवा, आंध्र प्रदेश आणि कर्नाटकातून भाविक मोठ्या संख्येने कोल्हापूर दाखल झाले आहेत. नवरात्रोत्सवातील शनिवार आणि रविवार हे गर्दीच्या दृष्टीने महत्त्वाचे दिवस मानले जातात.

यंदाही शनिवारपासून भाविकांची संख्या वाढण्यास सुरुवात झाली. रविवारी सुट्टीमुळे गर्दीत आणखी भर पडली. मुख्य दर्शन रांग, मुखदर्शन, अभिषेक आणि कळसदर्शनासाठी मंदिर परिसर भाविकांची गर्दी झाली होती.

मंदिराचा संपूर्ण परिसर भाविकांनी खचाखच भरला होता.
काकड आरतीपासून शेजारतीपर्यंत विविध धार्मिक विधिमध्ये सहभाग घेण्यासाठी भाविकांनी गर्दी केली. कुंकुमार्चन आणि अभिषेक करण्यासाठीही भाविक प्रतीक्षा रांगेत थांबले होते. देवीच्या दर्शनासोबतच धार्मिक विधी करण्यासाठी भाविकांची संख्या प्राधान्य दिले जात असल्याने मंदिर परिसरात दिवसभर वर्दळ कायम होती.

सुरक्षा व सुविधेसाठी प्रशासन सज्ज

साडेतीन शक्तिपिठांपैकी एक आणि दक्षिण काशी म्हणून ख्याती असलेल्या अंबाबाईच्या दर्शनासाठी नवरात्रोत्सवात दरवर्षी लाखो भाविक कोल्हापुरात येतात. यंदा घटस्थापनेपासून मंदिरात गर्दीचा ओघ वाढत आहे.

सात दिवसांत दहा लाख भाविकांनी दर्शन घेतल्याने आगामी दिवसार्हतही गर्दी कायम राहण्याची शक्यता आहे. वाढत्या गर्दीच्या पार्श्वभूमीवर भाविकांना सुरक्षितपणे दर्शन घेता यावे, तसेच रांगेतील प्रतीकेदरम्यान आवश्यक सुविधा उपलब्ध व्हाव्यात, यासाठी पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समिती, पोलीस प्रशासन आणि जिल्हा प्रशासनाकडून नियोजन केले जात आहे.

गर्दी वाढल्याने पाण्याची अतिरिक्त व्यवस्था

अंबाबाई मंदिरात दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची संख्या वाढल्याने पिण्याच्या पाण्याची व्यवस्था अधिक सक्षम करण्यात आली आहे. रविवारी गर्दीचा वाढता ओघ लक्षात घेऊन महापालिकेच्या वतीने पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीला अतिरिक्त पाणीपुरवठा करण्यात आला. यासाठी पाच हजार लिटर क्षमतेची पाण्याची टाकी अतिरिक्त भरून घेण्यात आली.

दर्शन रांगेत बराच वेळ थांबणाऱ्या भाविकांना पाणी उपलब्ध व्हावे, यासाठी पाणीवाटपाची व्यवस्था करण्यात आली. तसेच पाण्याचे जार आणि पाणीवाटपासाठी कर्मचारी वाढविण्यात आले. उन्हाचा तडाखा आणि लांबलेल्या दर्शन रांगा लक्षात घेता भाविकांना पाणी मिळावे, यासाठी प्रशासनाकडून विशेष खबरदारी घेण्यात आली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT