नृसिंहवाडी: पुढारी वृत्तसेवा : नृसिंहवाडी येथील कृष्णा-पंचगंगा नद्यांची पूरस्थिती ओसरत असून जनजीवन पूर्वपदावर येत आहे. गेल्या २४ तासांत ३ ते ४ फुटांनी पाणी उतरले आहे. नृसिंहवाडी ग्रामपंचायतीकडून युद्धपातळीवर स्वच्छता मोहीम राबवली जात असून पूरबाधित भागातील गाळ, कचऱ्याचे मोठ्या प्रमाणात संकलन केले जात आहे.
बाबर प्लॉट, माहेश्वरी परिसर, योगीराज कॉलनी, प्रबुद्धनगर आदी भागातील पुराचे पाणी ओसरू लागले आहे. या भागात योग्य ती खबरदारी म्हणून ग्रामपंचायत व आरोग्य विभागाकडून औषध, कीटकनाशक फवारणी करण्यात येत आहे. पाण्याची पातळी अनेक दिवस जैसे थे राहिल्याने रस्ते शेवाळले आहेत. त्यामुळे टँकरद्वारे पाण्याचा फवारा करून स्वच्छता केली जात आहे. सखल भागात साचून राहिलेल्या पाण्यात डासांची पैदास रोखण्यासाठी गप्पी मासे सोडण्यात येत आहे. सरपंच चित्रा सुतार यांनी नागरिकांना वैयक्तिक व सार्वजनिक स्वच्छता राखण्याचे आवाहन केले आहे. यावेळी उपसरपंच रमेश मोरे, सदस्य धनाजीराव जगदाळे व अन्य सदस्य यांनी पाहणी करत स्वच्छता मोहीम राबवून घेतली.
दत्त मंदिर परिसरातील पाणी उतरत असल्याने गुरूवारीपर्यंत श्रींची उत्सवमूर्ती गावातून मिरवणुकीने पुन्हा नारायण स्वामी मंदिरात आणली जाण्याची शक्यता आहे. मंदिर परिसरात देवस्थान कर्मचारी व स्वयंसेवकांनी स्वच्छता मोहीम हाती घेतली आहे. १७ दिवसांपासून पाण्यात असलेले दत्त मंदिर येत्या दोन-तीन दिवसांत खुले करण्याच्या दृष्टीने अध्यक्ष वैभव काळू पुजारी, सचिव सोनू पुजारी व इतर विश्वस्त प्रयत्नशील आहेत.