नृसिंहवाडी, विनोद पुजारी
कोल्हापूर जिल्ह्यातील ग्रामीण भागात सर्वात उंचीवर म्हणून नोंद असलेला कृष्णा नदीवरील नृसिंहवाडी औरवाडदरम्यान उभारण्यात आलेला पूल सुमारे पन्नास हजार हून अधिक ग्रामस्थांना सध्याच्या महापूर परिस्थितीत वरदान ठरलेला आहे. या पुलाचे बांधकाम केंद्रीय राखीव मार्ग निधीतून सन 2010 मध्ये सुरु झाले. हे बांधकाम दोन वर्षात पूर्ण करून सार्वजनिक बांधकाम खात्याने एक आदर्श निर्माण केला.
कृष्णा नदीपलीकडील औरवाड ,गौरवाड , आलास, बुबनाळ ,शेडशाळ ,कवठे गुलंद गणेशवाडी या सात गावातील ग्रामस्थ मोठ्या पुलाअभावी गावातच अडकून राहायचे. या गावांना महापुराचा विळखा बसून बेटाचे स्वरूप प्राप्त होत होते. त्यामुळे येथील दैनंदिन जीवन पूर्णपणे विस्कळीत होत असे तात्कालीन खासदार श्रीमती निवेदिता माने, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते माजी खासदार राजू शेट्टी यांनी केंद्रीय स्तरावर पाठपुरावा करून 12 कोटी 66 लाख रुपये निधी प्राप्त करून देऊन हा मोठा पूल उभारला आहे. या पुलाची लांबी 294 मीटर असून रुंदी दहा मीटर आहे. नदीपात्रापासून 24 मीटर या पुलाची उंची असून आठ पियर वर हा पूल उभारण्यात आला आहे ज्यावेळी या पुलाला निधी कमी पडत होता त्यावेळी खासदार श्रीमती माने यांनी जातीने लक्ष घालून या पुलाचे काम युद्ध पातळीवर करून घेतले.