स्वराज्य कल्याण सेवाभावी संस्थेचे कार्यालय निवडणूक आचारसंहिता पथकाने सिल केले Pudhari
कोल्हापूर

Kolhapur News | भुदरगडमध्ये मनसे उमेदवार डॉ. युवराज येडुरे यांच्यावर गुन्हा; मतदारांना देण्यासाठी आणलेला १ हजार कृषी पंपाचा साठा जप्त

Bhudargad ZP Election | निवडणूक प्रशासनाच्या भरारी पथकाची धडक कारवाई

पुढारी वृत्तसेवा

MNS candidate Dr. Yuvraj Yedure

गारगोटी : जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीचा कार्यक्रम अंतिम टप्प्यात असताना भुदरगड तालुक्यातील निवडणूक प्रशासनाच्या भरारी पथकाने मोठी कारवाई करत तब्बल १ हजार कृषि पंपाचा साठा जप्त केला आहे. या प्रकरणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उमेदवार डॉ. युवराज येडुरे यांच्यावर आचारसंहिता भंगाचा गुन्हा दाखल करण्यात आल्याने तालुक्यात राजकीय खळबळ उडाली आहे.

डॉ. युवराज येडुरे हे भुदरगड तालुक्यातील कुर पंचायत समिती गणातून मनसेचे उमेदवार असून, त्यांच्या मार्फत कागल तालुक्यातील बोरवडे येथे कृषी साहित्य मिळण्यासाठी फॉर्म भरून घेतले जात असल्याची गोपनीय माहिती भरारी पथकाला प्राप्त झाली होती. भुदरगड तालुक्यातील शेतकऱ्यांना बोरवडे येथे बोलावून शनिवार (दि. ३१ ) रोजी सकाळपासून फॉर्म भरून घेणे व दुपारी साहित्य वाटप होणार असल्याची खात्री पथकाने केल्यानंतर पोलीस विभागाच्या उपस्थितीत थेट धाड टाकण्यात आली.

कारवाईदरम्यान शेतीसाठी तणनाशक व औषध फवारणीसाठी वापरण्यात येणारे १ हजार कृषी पंप आढळून आले. या साहित्याची अंदाजे किंमत ३० लाख रुपये असल्याचे समजते. कॉर्पोरेट सामाजिक जबाबदारी (CSR) अंतर्गत मिळाल्याचे व अशासकीय संस्थेमार्फत (NGO) वाटप केले जात असल्याचे स्पष्टीकरण डॉ. येडुरे यांनी दिले.

मात्र, आचारसंहिता कालावधीत उमेदवार किंवा त्यांच्या प्रतिनिधीकडून मतदारांवर प्रभाव टाकेल असे कोणतेही साहित्य वाटप करण्यास सक्त मनाई असल्याने भरारी पथकाने सर्व साहित्य जप्त केले.

व्हिडीओ व सीसीटीव्ही फुटेजमधून साहित्य वाटप स्पष्ट

शनिवार दुपारपासून कृषी पंप वाटप झाल्याचे व्हिडीओ पुरावे भरारी पथकाला मिळाले आहेत. तसेच मुदाळ तिट्टा येथे निवडणूक विभागाने लावलेल्या स्थिर सर्वेक्षण पथकाच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात, विविध गावांतील शेतकरी कृषी पंप घेऊन जात असल्याचे स्पष्ट दिसून आले आहे. या सर्व बाबींच्या आधारे भरारी पथकाने मुरगूड पोलीस ठाण्यात डॉ. युवराज येडुरे यांच्याविरोधात आचारसंहिता भंगाचा गुन्हा शनिवारी रात्री उशिरा नोंदवला असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी तथा प्रांताधिकारी हरेश सुळ यांनी दिली.

दरम्यान, स्वराज्य कल्याण संस्थेच्या अध्यक्षा निवेदिता येडूरे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी स्पष्ट भूमिका मांडली. आमची संस्था गेली अनेक वर्षे सातत्याने सामाजिक कार्य करत आहे. शेतकऱ्यांसाठी अत्यावश्यक असलेले औषध फवारणी पंप वेळेत वाटप होणे गरजेचे होते. मात्र कारवाईच्या नावाखाली थेट शेतकऱ्यांची अडवणूक केली जात आहे, असा आरोप त्यांनी केला.

एकवेळ माझ्या पतीवर गुन्हा दाखल करा, मात्र शेतकऱ्यांना त्रास देऊ नका. प्रशासनाने कारवाई करताना शेतकऱ्यांच्या हिताचा विचार करावा.
- निवेदिता येडूरे

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT