

Kolhapur Black Magic in Election Campaign
टोप : जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांचे वारे जोरात वाहू लागले असून प्रचाराला चांगलीच रंगत आली आहे. या दरम्यान टोप येथे गुरुवारी रात्री एक वेगळाच व धक्कादायक प्रकार उघडकीस आल्याने गावात खळबळ उडाली आहे.
कासारवाडी फाटा ते जोतिबा रोडकडे जाणाऱ्या मार्गावर काँग्रेस व शिवसेना (ठाकरे गट) उमेदवाराच्या प्रचार पत्रकावर भानामतीचा संशयास्पद प्रकार आढळून आला. सदर ठिकाणी भाकरी, मसालेभात, तंबाखू, सिगारेट, लिंबू आदी साहित्य ठेवण्यात आल्याचे निदर्शनास आले.
या प्रकारामुळे परिसरात भीतीचे व संशयाचे वातावरण निर्माण झाले असून नागरिकांमध्ये चर्चेला उधाण आले आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अशा अंधश्रद्धेला खतपाणी घालणाऱ्या प्रकारांचा तीव्र निषेध होत आहे.
दरम्यान, घटनेची माहिती मिळताच काँग्रेस व शिवसेना (ठाकरे गट) यांच्या कार्यकर्त्यांनी घटनास्थळी भेट देत या प्रकाराचा जाहीर निषेध केला. लोकशाही प्रक्रियेत अंधश्रद्धा व भीती पसरवणाऱ्या अशा कृत्यांना आळा घालावा, अशी मागणी होत आहे.