MSRTC free toilet service from June 1 
कोल्हापूर

प्रवाशांना मोठा दिलासा! १ जूनपासून राज्यातील सर्व ST बस स्थानकांतील स्वच्छतागृहे होणार 'मोफत'

ST Bus Stand | परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची कोल्हापुरातून घोषणा

पुढारी वृत्तसेवा

कोल्हापूर: राज्यातील लाखो प्रवाशांसाठी एक अत्यंत आनंदाची आणि महत्त्वाची बातमी समोर आली आहे. येत्या १ जूनपासून महाराष्ट्र राज्यातील सर्व बस स्थानकांवरील स्वच्छतागृहे प्रवाशांसाठी पूर्णपणे मोफत केली जाणार आहेत. राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी आज कोल्हापूर दौऱ्यावर असताना ही महत्त्वपूर्ण घोषणा केली.

मंत्र्यांची कोल्हापुरात 'सरप्राईज व्हिजिट'

परिवहन मंत्री प्रताप सरनाईक आज कोल्हापूर दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी कोणतीही पूर्वसूचना न देता कोल्हापुरातील मध्यवर्ती बस स्थानकाला (CBS) अचानक भेट दिली. मंत्र्यांच्या या धाडसी निर्णयामुळे स्थानकावरील प्रशासकीय अधिकाऱ्यांची चांगलीच धावपळ उडाली. या भेटीदरम्यान त्यांनी बस स्थानकातील कॅन्टीन आणि स्वच्छतागृहांची प्रत्यक्ष पाहणी केली.

कंत्राटदाराची घेतली झाडाझडती

स्वच्छतागृहाची पाहणी करताना तिथली चकाकी पाहून मंत्र्यांनी कंत्राटदाराला टोला लगावला. "मी आज येणार आहे म्हणून ही एवढी स्वच्छता केली आहे का?" असा सवाल करत त्यांनी कर्मचाऱ्यांना धारेवर धरले. महत्त्वाचे म्हणजे, अनेक बस स्थानकांवर स्वच्छतागृहासाठी प्रवाशांकडून जादा पैसे आकारले जात असल्याच्या तक्रारी वारंवार येत होत्या. या तक्रारींची गंभीर दखल घेत सरनाईक यांनी संबंधित कंत्राटदाराला जाब विचारला आणि नियमांचे उल्लंघन झाल्यास कडक कारवाईचा इशारा दिला.

कॅन्टीनमधील दरांबाबतही चौकशी

केवळ स्वच्छतागृहावरच न थांबता, मंत्र्यांनी बस स्थानकावरील कॅन्टीनलाही भेट दिली. तिथे लावण्यात आलेल्या दर फलकाबाबत (Rate Card) त्यांनी सविस्तर विचारणा केली. प्रवाशांची खाद्यपदार्थांच्या बाबतीत लूट होऊ नये, अशा सूचना त्यांनी यावेळी प्रशासनाला दिल्या. "प्रवाशांची गैरसोय खपवून घेतली जाणार नाही. १ जूनपासून महाराष्ट्रातील प्रत्येक एसटी स्थानकावर प्रवाशांना मोफत स्वच्छतागृहाची सुविधा मिळेल, यासाठी आम्ही कटिबद्ध" असल्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी यावेळी बोलताना स्पष्ट केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT