कोल्हापूर : आशिष शिंदे
हवामान बदलाचे गंभीर परिणाम आता राज्याच्या प्रत्येक कोपर्यात जाणवत असून, वाढत्या उष्णतेचा धोका अधिक गडद होत आहे. पावसाळ्यातही रात्रीच्या तापमानात होणारी वाढ ही धोक्याची सूचना देत आहे. नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या ‘काऊंसिल ऑन एनर्जी, एन्व्हायर्न्मेंट अँड वॉटर’ (सीईईडब्ल्यू) या प्रतिष्ठित संस्थेच्या अहवालानुसार, कोल्हापूरसह राज्यातील तब्बल 78 टक्के जिल्हे उष्णतेच्या बाबतीत ‘हाय रिस्क’ झोनमध्ये पोहोचले आहेत. हे बदल केवळ तापमानापुरते मर्यादित नसून, वाढलेली आर्द्रता आणि रात्रीची उष्णता थेट नागरिकांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम करत आहे.
आरोग्यावर थेट परिणाम
दिवसाच्या कमाल आणि रात्रीच्या किमान तापमानातील घटते अंतर ही सर्वात मोठी चिंतेची बाब आहे. कोल्हापुरात गेल्या आठवड्यात हे अंतर केवळ 3 ते 5 अंशांवर आले होते. तापमानातील फरकाचा आरोग्यावर परिणाम दिवसाच्या उष्णतेनंतर शरीराला थंडावा मिळण्यासाठी कमाल आणि किमान तापमानात किमान 8 ते 10 अंशांचा फरक आवश्यक असतो. मात्र, हा फरक 3 ते 5 अंशांवर आल्यास शरीरातील उष्णता बाहेर पडण्यास वाव मिळत नाही. यामुळे झोपेवर परिणाम, रक्तदाब वाढणे आणि मानसिक अस्वस्थता यांसारखे आजार बळावत आहेत. याचा सर्वाधिक धोका वृद्ध, लहान मुले आणि गरोदर महिलांना आहे.
1.उच्च धोका : राज्यातील 78 टक्के जिल्हे ‘व्हेरी हाय रिस्क’ झोनमध्ये, तर उर्वरित 22 टक्के जिल्हे ‘हाय रिस्क’ झोनमध्ये आहेत.
2.उष्ण रात्री : भारतातील सुमारे 70 टक्के जिल्ह्यांमध्ये उन्हाळ्यात अत्यंत उष्ण रात्रींचे प्रमाण वाढले असून, शहरी भागांना याची सर्वाधिक झळ बसत आहे.
3.वाढलेली आर्द्रता : कोल्हापूरसारख्या शहरामध्ये आर्द्रता वाढल्याने प्रत्यक्ष तापमानापेक्षा जास्त उकाडा जाणवत आहे. यामुळे घामाचे बाष्पीभवन होत नाही, परिणामी, ‘हीट स्ट्रेस’ आणि ‘हीट स्ट्रोक’चा धोका वाढतो.
शहरात वाढलेले काँक्रिटचे जंगल आणि रस्ते दिवसा उष्णता शोषून घेतात आणि रात्री ती हळूहळू बाहेर फेकतात. यामुळे रात्री थंडावा मिळण्याऐवजी उष्णता जाणवते. यालाच ‘अर्बन हीट आयलंड’ इफेक्ट म्हणतात. कोल्हापूरमध्ये 2005 ते 2024 या काळात रात्रीचे तापमान वाढण्यामागे हे एक प्रमुख कारण आहे.चेतन भोसले, पर्यावरण विभाग, शिवाजी विद्यापीठ