Gram Panchayat Election file photo
कोल्हापूर

Gram Panchayat Election: मतदार यादीनंतर ग्रामपंचायत निवडणुकांचे रणशिंग? गावागावात राजकीय हालचालींना वेग

राज्य निवडणूक आयोगाने ४ ऑगस्ट रोजी राज्यातील मुदत संपलेल्या ग्रामपंचायत निवडणुकांची अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करण्याचे निश्चित केल्याने निवडणूक प्रक्रियेला गती मिळणार आहे.

पुढारी वृत्तसेवा

Gram Panchayat Election:

शिरढोण/ बिरू व्हसपटे: राज्यातील मुदत संपलेल्या ग्रामपंचायत निवडणुकांचा मार्ग आता मोकळा होण्याची चिन्हे दिसत आहेत. राज्य निवडणूक आयोगाने ४ ऑगस्ट रोजी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करण्याचे निश्चित केल्याने निवडणूक प्रक्रियेला गती मिळणार असल्याचे मानले जात आहे. त्यामुळे अनेक महिन्यांपासून प्रशासकांच्या ताब्यात असलेल्या ग्रामपंचायतींमध्ये लोकनियुक्त प्रतिनिधी निवडण्याचा मार्ग खुला होण्याची शक्यता आहे. मात्र, राज्यात अतिवृष्टीची परिस्थिती निर्माण झाल्यास किंवा श्रावणातील सण-उत्सवांमुळे प्रशासकीय यंत्रणा व्यस्त राहिल्यास निवडणूक कार्यक्रम काही काळ पुढे जाण्याची शक्यता नाकारता येत नाही.

राज्य निवडणूक आयोगाच्या प्राथमिक नियोजनानुसार ४ ऑगस्टला अंतिम मतदार यादी प्रसिद्ध होणार आहे. त्यानंतर ऑगस्टच्या पहिल्या पंधरवड्यात ग्रामपंचायत निवडणुकीचा अधिकृत कार्यक्रम जाहीर होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यानंतर उमेदवारी अर्ज दाखल करणे, अर्जांची छाननी, अर्ज माघार, चिन्ह वाटप, प्रचार आणि मतदानाची प्रक्रिया टप्प्याटप्प्याने राबविण्यात येणार आहे. आयोगाच्या अधिकृत अधिसूचनेनंतरच अंतिम वेळापत्रक स्पष्ट होईल.

राज्यातील अनेक ग्रामपंचायतींची मुदत संपूनही विविध कारणांमुळे निवडणुका होऊ शकलेल्या नाहीत. परिणामी अनेक ठिकाणी प्रशासकांमार्फत कारभार सुरू असून लोकप्रतिनिधींच्या निवडीची मागणी नागरिकांकडून सातत्याने होत आहे. अंतिम मतदार यादी जाहीर होण्यापूर्वीच इच्छुक उमेदवारांनी गावागावात बैठका, कार्यकर्त्यांचे मेळावे, मतदार संपर्क आणि पॅनेल बांधणीला सुरुवात केली आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील राजकीय वातावरण चांगलेच तापू लागले आहे.

निवडणुकीची घोषणा होताच आदर्श आचारसंहिता लागू होणार असल्याने नवीन विकासकामांना मंजुरी, भूमिपूजन व उद्घाटन कार्यक्रमांवर निर्बंध येण्याची शक्यता आहे. त्यामुळे लोकप्रतिनिधी, इच्छुक उमेदवार आणि ग्रामस्थांचे लक्ष आता राज्य निवडणूक आयोगाच्या पुढील निर्णयाकडे लागले आहे.

संभाव्य निवडणूक वेळापत्रक

४ ऑगस्ट रोजी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध होणार आहे. त्यानंतर ऑगस्टच्या पहिल्या पंधरवड्यात निवडणूक कार्यक्रम जाहीर होण्याची शक्यता आहे. त्यानंतर उमेदवारी अर्ज, छाननी, अर्ज माघार, चिन्ह वाटप, प्रचार व मतदानाची प्रक्रिया पार पडेल. मात्र, राज्यात मुसळधार पाऊस, पूरस्थिती किंवा सणासुदीमुळे प्रशासकीय यंत्रणेवर ताण आल्यास निवडणूक कार्यक्रम पुढे ढकलला जाऊ शकतो. अधिकृत कार्यक्रम जाहीर होताच संबंधित ग्रामपंचायतींसाठी आदर्श आचारसंहिता लागू होईल.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT