Madhuri Elephant Case: कोल्हापूरमधील माधुरी हत्तीणीच्या प्रकरणात मोठी अपडेट समोर आली आहे. माधुरी हत्तीणीला पुन्हा वनतारामध्ये स्थलांतरित करण्याची मागणी करणारी PETA इंडियाची याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली आहे. त्यामुळे माधुरी हत्तीण नांदणी मठातच राहणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. याचिका फेटाळताना न्यायालयाने PETA ला २५ हजार रुपयांचा दंडही ठोठावला आहे.
माधुरी हत्तीणीला नांदणी मठातून पुन्हा वनतारामध्ये पाठवण्यात यावे, अशी मागणी PETA इंडियाने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करून केली होती. माधुरी हत्तीणीला कोल्हापूरमध्ये परत आणल्यानंतर तिच्या राहण्यावर आणि तिला मिळणाऱ्या वागणुकीवर PETA ने प्रश्न उपस्थित केले होते.
११ आणि १२ सप्टेंबर रोजी माधुरी हत्तीण कोल्हापूरमध्ये परतली, त्यावेळी मोठ्या प्रमाणात फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली. तसेच ढोल-ताशांचा आवाज आणि मोठ्या घोषणांमुळे तिला त्रास झाल्याचा दावा PETA इंडियाने केला होता. माधुरी हत्तीणीला साखळदंडात बांधून ठेवल्यामुळे तिच्या स्वातंत्र्यावर मर्यादा आल्याचा आरोपही संस्थेने केला होता.
या परिस्थितीचा विचार करून माधुरी हत्तीणीला पुन्हा वनतारामध्ये स्थलांतरित करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने तातडीने हस्तक्षेप करावा, अशी मागणी याचिकेत करण्यात आली होती.
मात्र, सर्वोच्च न्यायालयाने PETA इंडियाची ही याचिका फेटाळून लावली. त्यामुळे माधुरी हत्तीणीला पुन्हा वनतारामध्ये पाठवण्याची मागणी न्यायालयाने मान्य केलेली नाही. याशिवाय, याचिका दाखल केल्याप्रकरणी PETA ला २५ हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे.
सुनावणीदरम्यान न्यायालयाने, सर्वजण आनंदी असताना तुम्हालाच काय अडचण आहे, असा सवाल उपस्थित केला आहे.
सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे माधुरी हत्तीणीला पुन्हा वनतारामध्ये पाठवण्याची मागणी तूर्तास फेटाळली आहे. त्यामुळे माधुरी हत्तीण नांदणी मठातच राहणार आहे. या निर्णयामुळे माधुरी हत्तीणीच्या भवितव्याबाबत सुरू असलेल्या चर्चेला महत्त्वाचे वळण मिळाले आहे.