Madhuri Elephant | ‘माधुरी’ला पुन्हा ‘वनतारा’मध्ये पाठवा; ‘पेटा’चे सर्वोच्च न्यायालयाला साकडे

Madhuri Elephant |
Madhuri Elephant | ‘माधुरी’ला पुन्हा ‘वनतारा’मध्ये पाठवा; ‘पेटा’चे सर्वोच्च न्यायालयाला साकडे
Published on: 
Updated on: 

जयसिंगपूर : नांदणी (ता. शिरोळ) येथील स्वस्तिश्री जिनसेन भट्टारक पट्टाचार्य महास्वामीजी संस्थान मठात परतलेल्या ‘माधुरी’ हत्तिणीचे पुनर्वसनाच्या दृष्टीने जामनगरमधील ‘वनतारा’त पुन्हा स्थलांतर करण्यासाठी तातडीने हस्तक्षेप करावा, अशी मागणी ‘पेटा इंडिया’ने सर्वोच्च न्यायालयाला केली आहे.

‘माधुरी’ हत्तीण परतली, तेव्हा तिला फटाक्यांची आतषबाजी, कर्णकर्कश घोषणा, ढोल-ताशांच्‍या आवाजाला सामोरे जावे लागले. आता ती साखळदंडात जखडलेल्या एकाकी कैद्याप्रमाणे जीवन जगत आहे, असा आरोप ‘पेटा इंडिया’ने केला आहे. तत्पूर्वी, ती ‘वनतारा’मध्ये आपली मैत्रीण ‘शांती’ हत्तिणीबरोबर मुक्त विहाराचा आनंद घेत होती. हत्तिणीच्या दीर्घकालीन स्वास्थ्यासाठी नांदणीतील तिचे सध्याचे ठिकाण अयोग्य असल्याचा निष्कर्ष तज्ज्ञांनी यापूर्वीच दिला आहे, असेही संस्थेच्या धोरण विभागाच्या उपाध्यक्ष खुशबू गुप्ता यांनी म्हटले आहे.

३३ वर्षे मठात एकाकी जीवन घालविल्यानंतर पायांना झालेली दुखापत, गुडघ्यांची सूज यामुळे ‘माधुरी’ला मिरवणुकांमधून डांबरी रस्त्यांवर चालणे आणि कठीण पृष्ठभागावर दीर्घकाळ उभे राहणे असह्य झाले होते. या पार्श्वभूमीवर तिची रवानगी ‘वनतारा’मध्ये करण्यात आली होती. ‘पेटा इंडिया’च्या अर्जात ‘माधुरी’ला पुन्हा मठात हलवणे हे मुंबई उच्च न्यायालयाच्या १६ जुलै २०२५ रोजीच्या आदेशाचे आणि सर्वोच्च न्यायालयाच्या २८ जुलै २०२५ रोजीच्या आदेशाचे उल्लंघन असल्याकडेही लक्ष वेधण्यात आले आहे. दरम्यान, याबाबत नांदणी मठाकडून माहिती घेण्याचा प्रयत्न केला असता, स्वस्तिश्री जिनसेन भट्टारक पट्टाचार्य महास्वामीजी धार्मिक कार्यासाठी उत्तर भारतात गेले असल्याने त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news