Kolhapur Heritage : वारसा कोल्हापूरचा संवर्धन करूया 
कोल्हापूर

Kolhapur Heritage : वारसा कोल्हापूरचा संवर्धन करूया

रणजित गायकवाड

कोल्हापूर; पुढारी वृत्तसेवा : Kolhapur Heritage : शाहूनगरी कोल्हापूरला सांस्कृतिक, सामाजिक, कला-क्रीडा, वास्तू, गडकोट-किल्ले यांचा वैभवशाली वारसा आहे. हा वारसा अभिमानाने जतन, संवर्धन करून पुढील पिढीपर्यंत पोहोचविण्याची आवश्यकता आहे, असे मत मान्यवरांनी व्यक्त केले.

दै. 'पुढारी' प्रयोग सोशल फाऊंडेशन, मेन राजाराम महाविद्यालय व छत्रपती शहाजी महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने 'वारसा कोल्हापूरचा' या विषयावर हेरिटेज वॉक व परिसंवादाचे आयोजन केले होते. अध्यक्षस्थानी उपप्राचार्य व्ही. बी. डोणे होते. उपक्रमाचा प्रारंभ जुना राजवाडा येथील ऐतिहासिक नगारखाना, मेन राजाराम हायस्कूलची इमारत येथे हेरिटेज वॉकने झाला. वास्तू शिल्पकला, ऐतिहासिक महत्त्व, भौगोलिक स्थान, बांधकाम शैली याविषयी विद्यार्थ्यांना माहिती देण्यात आली.

कोल्हापूर पुरालेखागारचे अभिलेख अधिकारी गणेशकुमार खोडके, वास्तुविशारद अजित जाधव, इतिहास विभागप्रमुख डॉ. सुरेश शिखरे यांनी मार्गदर्शन केले. यावेळी खोडके म्हणाले, राजर्षी शाहू महाराजांच्या शैक्षणिक चळवळीचे जीवनकार्य दसरा चौक येथील वसतिगृहांच्या माध्यमातून दिसते. त्यामुळे राजाराम महाराज यांनी पुतळ्यासाठी त्या जागेची निवड केल्याच्या नोंदी आहेत. स्थान महात्म्य ओळखून वारसा जपणुकीचे हे जिवंत उदाहरण आहे. वारसा जपला नाही, तर कधीही न भरून येणारे नुकसान होणार आहे.
जाधव म्हणाले, ऐतिहासिक जुना राजवाडा येथे बांधण्यात आलेला भव्य नगारखाना वास्तुकलेचा जगप्रसिद्ध ठेवा आहे. करवीर संस्थानच्या वैभवात या वास्तू भर घालतात. पर्यटन विकासाच्या द़ृष्टीने या वास्तूंविषयी माहिती असणे आवश्यक आहे.

शिखरे म्हणाले, कोल्हापुरातील प्रत्येक गावाला स्वतःचा इतिहास आहे. लिखित स्वरूपात संग्रह केल्यास गावांचे महत्त्व अधोरेखित होईल. यावेळी आर. व्ही. देशमुख, एच. एम. काटकर, व्ही. ए. पाटील, बी. टी. यादव, बी. टी. दराडे आदी उपस्थित होते. बी. पी. माळवे यांनी सूत्रसंचालन केले. जी. व्ही. खाडे यांनी आभार मानले. उपक्रमास प्राचार्य एस. एस. नाईक, आर. के. शानेदिवाण यांचे विशेष सहकार्य लाभले.

चित्रफितींच्या संग्रहाबद्दल दै. 'पुढारी'चे अभिनंदन

दै 'पुढारी'च्या वतीने 'कोल्हापूरचा वारसा' सांगणार्‍या 115 माहितीपूर्ण चित्रफितींचा संग्रह करण्यात आला आहे. या चित्रफितींच्या माध्यमातून कोल्हापूरचा वारसा जपणुकीस दिशा मिळत असल्याचे मत मान्यवरांनी व्यक्त केले. 'हेरिटेज कोल्हापूर' या सातत्यपूर्ण उपक्रमाबद्दल मान्यवरांनी दै. 'पुढारी'चे अभिनंदन केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT