Satej Patil : ‘दरवर्षी पाच जिल्ह्यांमध्ये फेन्सिंग हॉल उभारणार’ | पुढारी

Satej Patil : 'दरवर्षी पाच जिल्ह्यांमध्ये फेन्सिंग हॉल उभारणार'

कोल्हापूर : पुढारी वृत्तसेवा

राज्यात फेन्सिंग (तलवारबाजी) खेळाला चालना मिळावी. या खेळात राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर प्रतिनिधीत्व करण्याची संधी राज्यातील खेळाडूंना उपलब्ध व्हावी, यासाठी राज्यातील पाच जिल्ह्यात फेन्सिंग (तलवारबाजी) साठी डेडिकेटीव्ह हॉल निर्माण करण्यात येतील अशी घोषणा महाराष्ट्र फेन्सिंग असोसिएशनचे अध्यक्ष व राज्याचे गृह राज्यमंत्री सतेज पाटील ( Satej Patil ) यांनी केली आहे. ३२ व्या वरिष्ठगट राज्यस्तर फेन्सिंग (तलवारबाजी) अजिंक्यपद स्पर्धेच्या उद्घाटन कार्यक्रमात ते बोलत होते. श्रीमंत शाहू महाराज छत्रपती महराज यांच्या हस्ते या स्पर्धेचा शुभारंभ झाला.

३२ व्या वरिष्ठगट राज्यस्तर फेन्सिंग (तलवारबाजी) अजिंक्यपद स्पर्धेला आज सुरवात झाली आहे. महाराष्ट्र फेन्सिंग असोसिएशनच्या अधिपत्त्याखाली कोल्हापूर फेन्सिंग (तलवारबाजी) असोसिएशन, डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठ आणि शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमाने ही स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. शिवाजी विद्यापीठाच्या राजमाता जिजाऊसाहेब बहुउद्देशिय सभागृहात ही स्पर्धा होत आहे.

यावेळी बोलताना मंत्री सतेज पाटील ( Satej Patil ) यांनी, दरवर्षी पाच जिल्ह्यात केवळ फेन्सिंग खेळासाठी हॉल उभे करण्याची घोषणा केली. फेन्सिंग खेळ राज्यात एक नंबरचा बनविण्यासाठी येणाऱ्या काळात आपले प्रयत्न असतील. कोरोना कालावधीनंतर प्रथमच राज्यस्तरवरील मोठ्या स्पर्धेचे आयोजन होत असल्याचे त्यांनी सांगितले.

फेन्सिंग मधला कोणताही खेळाडू आर्थिक परिस्थितीमुळे मागे राहू नये यासाठी अशा खेळाडूंना असोसिएशनकडून दत्तक घेऊन आर्थिक पाठबळ दिले जाईल, असे त्यांनी सांगितले. कोल्हापूर शैर्याची भूमी आहे. याठिकाणी होणाऱ्या स्पर्धेतून राज्याचा संघ निवडला जाणार आहे. जानेवारीमध्ये पतियाळा येथे होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेसाठी २४ खेळाडूंचा हा संघ प्रतीनिधीत्व करेल. तेथेही हे खेळाडू महाराष्ट्राचा झेंडा डौलाने फडकवतील असा विश्वास ना. सतेज पाटील यांनी व्यक्त केला. तसेच ऑलिम्पिकमध्ये पदक मिळवणारा खेळाडू महाराष्ट्राचा असेल असा संघटनेचा प्रयत्न राहील असे ते म्हणाले.

डीपीडीसीमधून नाविन्यपूर्ण योजनेतर्गत या खेळासाठी साहित्य उपलब्ध करून देणारा कोल्हापूर हा पहिला जिल्हा आहे. अशाचप्रकारे अन्य जिल्ह्यानीही निधी द्यावा यासाठी पालकमंत्र्यांना पत्र लिहिणार आल्याचे त्यांनी सांगितले. हा क्रिडा प्रकार बळकट करण्यासाठी आपले सर्वतोपरी प्रयत्न आहेत. यासाठी येणाऱ्या सुचनाचेही स्वागत असल्याचे सांगत पाटील यांनी आपला मोबाईल क्रमांक त्यासाठी जाहीर केला.

श्रीमंत शाहू महाराज छत्रपती यांनी, जो पर्यंत एखाद्या खेळाला शासन आश्रय मिळत नाही, तो पर्यंत कोणताही खेळ पुढे येऊ शकत नाही. क्रिकेट सोडून इतर खेळातही शासनाने लक्ष घालण्याची गरज असल्याचे सांगितले. तलवारबाजी हा पारंपरिक खेळ असून त्यांच्या आधुनिक स्वरूप असलेल्या फेन्सिंगकडे जास्तीत जास्त खेळाडूंनी वळावे असे आवाहन केले. डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठाचे कुलगुरु डॉ राकेशकुमार मुदगल, यांनी खेळामध्ये जय- पराजय होत असतो, मात्र जिंकणाऱ्या खेळाडूने अहंकार न ठेवता, अधिक चांगल्या प्रकारे खेळासाठी प्रयत्न करणे गरजेच असल्याच सांगितले. शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के यांनी या स्पर्धेच्या माध्यमातून ऑलम्पिक स्तरावरील खेळाडू बनतील. असा विश्वास व्यक्त करत या स्पर्धेच्या माध्यमातून मिशन ऑलम्पिकची सुरवात झाल्याचही त्यांनी सांगितलं.

दरम्यान इपी, फॉईल व सेंबर या तीन प्रकारात होणाऱ्या या स्पर्धेत राज्यभरातील सुमारे ५०० खेळाडू सहभागी झालेत. या स्पर्धेच्या उद्घाटन सोहळ्याला शिवाजी विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. पी. एस. पाटील, डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठाचे प्र- कुलगुरू डॉ. शिंपा शर्मा, रजिस्ट्रार विश्वनाथ भोसले, डी. वाय. पाटील ग्रुपचे कार्यकारी संचालक ए. के. गुप्ता, महाराष्ट्र फेन्सिंग असोसिएशनचे कार्याध्यक्ष प्रकाश काटोळे, सचिव उदय डोंगरे, सल्लागार अशोक दुधारे, खजिनदार राजकुमार सोमवंशी, संजय सबनीस, जिल्हा क्रीडा अधिकारी डॉ. चंद्रशेखर साखरे, विनय जाधव, स्पर्धा संयोजक समितीचे अध्यक्ष संजय जाधव आदींची उपस्थिती होती.

Back to top button