मरणहोळ : वनरक्षक ए. बी. सकपाळ यांना आढळलेला बिबट्याच्या पायाचा ठसा  Pudhari
कोल्हापूर

Chandgad Leopard | चिंचणे, कामेवाडी, नरगट्टे जंगलात बिबट्याचा वावर स्पष्ट

बिबट्याच्या पायांचे ठसे आढळले; शेतकऱ्यांनी खबरदारी घेण्याचे वनविभागाचे आवाहन

पुढारी वृत्तसेवा

Chandgad Leopard Presence Confirmed

चंदगड : चंदगड, बेळगाव आणि हुक्केरी या तीन तालुक्यांच्या सीमावर्ती जंगल परिसरात बिबट्याचा वावर असल्याचे स्पष्ट झाले आहे. चिंचणे, कामेवाडी आणि नरगट्टे (ता. चंदगड) तसेच मरणहोळ (ता. बेळगाव), सलामवाडी, शट्टीहळी आणि मोदगा (ता. हुक्केरी) या गावांच्या सीमेलगतच्या जंगलात बिबट्याच्या पायांचे ठसे आढळून आले आहेत. त्यामुळे परिसरातील शेतकरी आणि ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

बिबट्याच्या पायांचे ठसे आढळल्यानंतर चंदगड आणि बेळगाव वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी पाहणी केली. ठशांची पाहणी केल्यानंतर या परिसरात बिबट्याचा वावर असल्याची खात्री वनविभागाला पटली. वनकर्मचाऱ्यांनी बिबट्याच्या पायांचे ठसे नोंदवून घेतले असून, त्याच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यास सुरुवात केली आहे.

दरम्यान, बेळगाव वनविभागाच्या अधिकाऱ्यांनीही घटनास्थळी भेट देऊन परिसराची पाहणी केली. तीन तालुक्यांच्या सीमेवरील जंगलात बिबट्याचा वावर आढळून आल्याने शेतकऱ्यांनी विशेष खबरदारी घेण्याची गरज आहे. पाटणे वनपरिक्षेत्राच्या वनक्षेत्रपाल शितल पाटील आणि वनपाल जॉन्सन डिसोजा यांनी नागरिकांना सावधानतेचे आवाहन केले आहे.

सुतगट्टी घाटातून बिबट्याचे आगमन?

सुमारे आठ दिवसांपूर्वी सुतगट्टी घाट परिसरात बेळगाव वनविभागाने एका पूर्ण वाढ झालेल्या आणि उपद्रवी ठरलेल्या बिबट्याला जेरबंद केले होते. त्या परिसरातूनच हा बिबट्या चंदगड तालुक्याच्या सीमावर्ती जंगलात दाखल झाला असण्याची शक्यता वनविभागाने व्यक्त केली आहे.

सीमावर्ती जंगल परिसरात बिबट्याच्या हालचाली स्पष्ट झाल्याने शेतकऱ्यांनी एकट्याने जंगलात जाऊ नये, विशेषतः सकाळी आणि संध्याकाळच्या वेळी शेताकडे जाताना सतर्क राहावे, असे वनविभागाने सांगितले आहे. पशुधन जंगलालगत किंवा उघड्यावर बांधताना विशेष काळजी घेण्याचे आवाहनही करण्यात आले आहे.

दरम्यान, बिबट्याच्या हालचालींवर वनविभागाचे लक्ष असून नागरिकांनी घाबरून न जाता सावध राहावे आणि बिबट्या दिसल्यास त्याच्या जवळ जाण्याचा किंवा त्याला हुसकावण्याचा प्रयत्न न करता तातडीने वनविभागाला माहिती द्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT