Kolhapur Crime : ‘१०० टक्के रिझल्ट’चा करत होता दावा, अट्टल गुन्हेगाराचा कधी मोडणार कावा?

स्वप्निल पाटीलला कायद्याची भीतीच नाही : चार वर्षांत सहा गुन्हे दाखल
Kolhapur Crime News
Kolhapur Crime News
Published on
Updated on

कोल्हापूर : गर्भलिंग निदानाचे एकापाठोपाठ सहा गुन्हे... एका गुन्ह्यातून जामिनावर बाहेर येताच तत्काळ पोर्टेबल सोनोग्राफी मशिन खरेदी करून गर्भलिंग निदानाचा काळा धंदा सुरू करणारा स्वप्निल पाटील कायद्यातील पळवाटांचा पुरेपूर फायदा घेतो. गर्भलिंग निदानातून उभारलेल्या त्याच्या साम्राज्याला पोलिसांनी आता कायमस्वरूपी सुरूंग लावण्याची गरज आहे.

तपासणीसाठी वेगवेगळे ठिकाण

गर्भलिंग निदानामध्ये सोकावलेला स्वप्निल पोलिसांसमोर मोठ्या अविर्भावात गर्भलिंग निदान १०० टक्के बरोबरच असल्याचे सांगत होता. तीन महिन्यांनंतर महिला गर्भतपासणीसाठी स्वप्निलकडे येतात. यानंतर पुढील दोन महिने १५ दिवसांच्या अंतराने महिलांचे चेकअप करत होता. प्रत्येकवेळी रुग्णांना वेगवेगळ्या ठिकाणी बोलवत होता.

स्वप्निलवर सहा गुन्हे

स्वप्निल पाटील हा गर्भलिंगमधील सराईत असून, त्याच्यावर करवीरमध्ये ३, राधानगरी १, भुदरगड १, कागल १ असे गुन्हे दाखल आहेत. गुन्हा दाखल होताच स्वप्निल मशिनसह पसार होतो, दोन महिने कर्नाटक, निपाणी परिसरात आपले बस्तान बसवून गर्भलिंग निदान करून बक्कळ पैसे गोळा करतो. याच जोरावर वकिलांची फौज उभी करून सहा महिन्यांत पुन्हा बाहेर येतो. आजपर्यंत स्वप्निलच्या ताब्यातून सहा मशिन जप्त केली आहेत. मात्र, तरीही बंगळूर कनेक्शन वापरून तो नवीन मशिन खरेदी करतो.

मशिन विक्रेता, गर्भपाताच्या डॉक्टरची साखळीच

स्वप्निलने गर्भलिंग निदानामध्ये एसपी सरकार नावाने स्वत:चे साम्राज्य उभे केले आहे. जिल्ह्यासह कर्नाटक, सांगली परिसरात त्याने आपले एजंट पेरले आहेत. तसेच कारवाई झाल्यास त्यातून बाहेर पडण्यासाठी वकिलांची फौज, मशिन जप्त केल्यास मशिनही तत्काळ मिळवण्याची यंत्रणा, गर्भपातासाठी काही डॉक्टरही त्याने नेमले आहेत. स्वप्निलचे शिक्षण १२ वीपर्यंत झाले आहे. मात्र, तरीही तो पेशंटला आपण डॉक्टरच असल्याचे भासवत होता.

गुरुपेक्षा चेला निघाला भारी

गर्भलिंग निदानात कारवाई झालेल्या विजय कोळसकरच्या हाताखाली स्वप्निल पाटीलने गर्भलिंग निदानाचे प्रशिक्षण घेतले. यामध्ये तो मास्टर झाला. कोळसकरवर तीन गुन्हे असून, स्वप्निलवर सहा गुन्हे दाखल आहेत. कोळसकर, स्वप्निल यांची कपड्याच्या दुकानातून ओळख झाली. विजय कोळसकरने गर्भलिंग निदानाचे तंत्र स्वप्निलला शिकवले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news