Kolhapur Forest Department Search Operation
चंदगड : गंधर्वगड (ता. चंदगड) परिसरातील माणगाव, सोनारवाडीसह आठहून अधिक गावांच्या शिवारात बिबट्याची दहशत कायम आहे. बिबट्याला पकडण्यासाठी वनविभागाने पिंजरा लावला असला, तरी गेल्या चार दिवसांपासून तो वनविभागाला गुंगारा देत आहे. बिबट्याचे अधूनमधून दर्शन होत असल्याने शेतकरी आणि ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. सुगीच्या कामांचा हंगाम सुरू असतानाच बिबट्याच्या दहशतीमुळे शेतीची कामेही लांबणीवर पडत आहेत.
गंधर्वगड परिसरातील माणगाव आणि सोनारवाडी येथील खासगी मालकीच्या क्षेत्रात बिबट्याला पकडण्यासाठी पिंजरा लावण्यात आला आहे. मात्र, बिबट्या अद्याप जेरबंद झालेला नाही. सोनारवाडी परिसरात शुक्रवारी सायंकाळी शेतकऱ्यांना त्याचे दर्शन झाले. यापूर्वी चार दिवसांपूर्वी बिबट्याने मलतवाडी गावाच्या वेशीत प्रवेश केला होता. गेल्या तीन महिन्यांपासून गंधर्वगड जंगल परिसर आणि खासगी क्षेत्रात वावरणाऱ्या या बिबट्याचा उपद्रव आता आसपासच्या गावांच्या शिवारापर्यंत पोहोचला आहे.
बिबट्याकडून आतापर्यंत पाळीव कुत्र्यांवर हल्ले करण्यात आले आहेत. तसेच, हुंबरवाडी येथील एका शेतकऱ्याच्या बकऱ्यांच्या कळपाचा त्याने पाठलाग केल्याची घटना घडली आहे. त्यामुळे शेतात कामासाठी जाणाऱ्या महिला आणि शेतकरी अधिक धास्तावले आहेत.
बिबट्याला पकडण्यासाठी वनविभागाने मोहीम तीव्र केली आहे. पाटणे वनपरिक्षेत्राच्या वनक्षेत्रपाल शितल पाटील आणि वनपाल जॉन्सन डिसोजा यांच्या मार्गदर्शनाखाली रविवारी चंदगड वनपरिक्षेत्रासाठी सुरक्षेच्या दृष्टीने राखीव असलेला आणखी एक पिंजरा लावण्यात येणार असल्याची माहिती वनपाल जॉन्सन डिसोजा यांनी दिली.
कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी चंदगडचे वनपरिक्षेत्र अधिकारी तुषार गायकवाड यांचे पथकही सतर्क झाले आहे. बिबट्याचा माग काढण्यासाठी कोल्हापूर येथील अत्याधुनिक ड्रोन कॅमेरा पथकाची मदत घेतली जात आहे.
वनरक्षक साक्षी सपकाळ, रणजीत पाटील, वनसेवक तुकाराम गुरव, बसवानी नाईक, शुभम बांदेकर यांच्यासह हत्ती हाकारा पथकाचे कर्मचारी दिवस-रात्र परिसरावर लक्ष ठेवून आहेत. मात्र, बिबट्या अद्याप हाती लागत नसल्याने ग्रामस्थांमधील भीती कायम आहे. सुगीच्या कामांसाठी शेतात जाणेही धोकादायक वाटू लागल्याने शेतकऱ्यांसमोर कामे वेळेत पूर्ण करण्याचे आव्हान उभे राहिले आहे.