

Hatkanangale Former Sarpanch Assaulted
रेंदाळ : जंगमवाडी (ता. हातकणंगले) येथे किरकोळ कारणावरून झालेल्या वादातून माजी महिला सरपंच सरिता मोरे आणि त्यांचे सासरे संभाजी मोरे यांना घरात घुसून बेदम मारहाण केल्याची घटना शुक्रवारी रात्री दहाच्या सुमारास घडली. या हल्ल्यात दोघेही जखमी झाले आहेत. याप्रकरणी इचलकरंजी येथील शिवाजीनगर पोलिस ठाण्यात तक्रार नोंदविण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते.
याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की, जंगमवाडी येथील रामचंद्र खोत यांनी गटारींची साफसफाई होत नसल्याबद्दल, वेळेवर पाणी मिळत नसल्याबद्दल तसेच योजनेतील पैसे लाटल्याचा आरोप करत आक्षेपार्ह भाषेत शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. यावेळी माजी सरपंचांचे पती सागर मोरे आणि रामचंद्र खोत यांच्यात वाद झाला.
या वादाचा राग मनात धरून रामचंद्र खोत यांनी आपल्या दोन मुलांना सोबत घेतले. त्यानंतर काठी आणि लोखंडी गज घेऊन त्यांनी माजी महिला सरपंच सरिता मोरे यांच्या घरात प्रवेश केला. घरात घुसून सरिता मोरे आणि त्यांचे सासरे संभाजी मोरे यांना बेदम मारहाण करण्यात आली. या हल्ल्यात दोघेही जखमी झाले.
या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून, पोलिसांत तक्रार दाखल करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती.