कोल्हापूर (प्रतिनिधी) :
कोल्हापूर शहरात पुन्हा एकदा बिबट्याने हजेरी लावली आहे. शहरातील विवेकानंद कॉलेज परिसर आणि वूडलँड हॉटेल भागात बिबट्या दिसल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. शनिवारी रात्री उशिरा आणि रविवारी पहाटेपर्यंत बिबट्याने शहराच्या विविध भागात हिंडत राहिल्याने वनविभाग आणि पोलिसांची चांगलीच धावपळ उडाली.
मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी रात्री मेरी वेदर ग्राउंड परिसरात काही वाहनधारकांना रस्त्याच्या कडेला बिबट्या दिसल्याचे सांगण्यात आले. सुरुवातीला तो परिसरातील झाडीत दिसला आणि काही वेळाने तो थेट विवेकानंद कॉलेजजवळील वूडलँड हॉटेलमध्ये घुसला. उच्चभ्रू वस्तीत घडलेल्या या घटनेने नागरिकांमध्ये मोठी खळबळ उडाली.
हॉटेलमध्ये प्रवेश करताना बिबट्याने एका बंगल्याच्या compound wall वरून उडी मारली आणि थेट हॉटेलच्या बागेत शिरला. त्या वेळी बागेतील माळी काम करत होता. बिबट्याने अचानक त्याच्यावर झडप घातली, यात माळी किरकोळ जखमी झाला. त्यानंतर बिबट्याने हॉटेलमधील प्लेट धुत असलेल्या निखील कांबळे या युवकावरही हल्ला केला. तो सुदैवाने बचावला पण जखमी झाला आहे.
यानंतर बिबट्या वूडलँड हॉटेलमधून बाहेर पडून शेजारी असलेल्या बीएसएनएल कार्यालयात गेला. तिथून तो थेट महावितरण कार्यालयात घुसला आणि एका चेंबरमध्ये लपला. वनविभागाचे अधिकारी आणि कर्मचारी घटनास्थळी पोहोचले, मात्र बिबट्याला पकडताना वनरक्षक ओंकार काटकर यांच्यावर त्याने हल्ला केला. सुदैवाने त्यांना गंभीर दुखापत झाली नाही.
या घटनेनंतर वनविभागाने परिसर सील करून बिबट्याचा शोध सुरू केला आहे. रात्रीपासूनच वनकर्मचारी, पोलिस आणि स्थानिक प्रशासन संयुक्तरीत्या या परिसरात गस्त ठेवत आहेत. विवेकानंद कॉलेज परिसर, वूडलँड हॉटेल, बीएसएनएल ऑफिस आणि महावितरण परिसर या सर्व ठिकाणी बिबट्याच्या हालचालींवर नजर ठेवण्यात येत आहे.
शहरातील रहिवाशांना खबरदारीचा इशारा देण्यात आला आहे. नागरिकांना घराबाहेर न जाण्याचे, वाहनांमधून गर्दी न करण्याचे आणि रात्री बाहेर न पडण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
दरम्यान, हा बिबट्या कोठून आला याबाबत अद्याप स्पष्टता नाही. काहींचे मत आहे की तो आसपासच्या जंगलातून किंवा पंचगंगा नदीकाठच्या भागातून शहरात शिरला असावा. पोलीस या घटनेचा सखोल तपास करत आहेत.
यापूर्वीही कोल्हापूर शहरात अशा घटना घडल्या आहेत. १ जानेवारी २०१५ रोजी रुईकर कॉलनीत बिबट्या दिसला होता. त्यावेळी त्याला पकडताना त्याचा मृत्यू झाला होता. तसेच डिसेंबर १९९५ साली कसबा बावडा परिसरात बिबट्याच्या हल्ल्यात एका तरुणीचा मृत्यू झाला होता. त्यामुळे या नव्या घटनेने जुन्या आठवणी पुन्हा जाग्या झाल्या आहेत.
सध्या वनविभागाचे पथक बिबट्याला जिवंत पकडण्यासाठी प्रयत्न करत आहे. परिसरात पिंजरे लावण्यात आले असून नागरिकांनी घाबरू नये, पण सतर्क राहावे, असे आवाहन वनअधिकाऱ्यांनी केले आहे.