

आशिष शिंदे
कोल्हापूर : कोल्हापूरची हवा दिवसेंदिवस शहरवासीयांसाठी विषाक्त बनत आहे. गेल्या पंधरा दिवसांत कोल्हापूरच्या हवा गुणवत्ता निर्देशांकाने धोका पातळी ओलांडली नसली तरी शहरात भूपृष्ठीय ओझोन प्रदूषणाचे संकट निर्माण झाले आहे. धक्कादायक बाब म्हणजे या कालावधीत भूपृष्ठीय ओझोन चार वेळा प्रमुख प्रदूषक ठरले. यापूर्वी कोल्हापुरात अतिसूक्ष्म धूलिकण हवा प्रदूषणाचे मुख्य कारण असत. परंतु आता भूपृष्ठीय ओझोनचे प्रमाण अधून मधून धोका पातळीवर जात असल्याचे केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या एका अहवालातून समोर आले आहे. यामुळे कोल्हापूरकरांनी वेळीच सावध न झाल्यास प्रदूषणाची दिल्ली दूर नाही.
दिल्लीतही पाच ते दहा वर्षांपूर्वी भूस्तरीय ओझोन वाढण्याचे संकेत दिसू लागले होते आणि पुढे कणप्रदूषणाचे संकट अधिक तीव्र झाले. त्याच पॅटर्नची भीती आता कोल्हापुरातही तज्ज्ञ व्यक्त करीत आहेत. शहरातील वाहतूक वाढ, सिग्नलवरील गर्दी, उष्णतेतील बदल आणि शहरीकरण यामुळे ओझोनचे प्रमाण वाढण्याची शक्यता जास्त आहे. यामुळे आता केवळ धूलिकणांवर नियंत्रणासाठी नव्हे तर भूपृष्ठीय ओझोनसह हवा प्रदूषण रोखण्यासठी स्वतंत्र उपाययोजना करणे आवश्यक आहे.
असे होते ओझोन प्रदूषण
ओझोन हा थेट उत्सर्जित न होता द्वितीयक प्रदूषक आहे. वाहनांतून व उद्योगांतून निघणारे नायट्रोजन ऑक्साईड आणि वाष्पशील सेंद्रिय संयुगांची सूर्यप्रकाशात रासायनिक प्रतिक्रिया होऊन ओझोन तयार होतो. उन्हाळा, कोरडे हवामान आणि कमी वार्याचे दिवस हे भूपृष्ठीय ओझोन निर्मितीला पूरक ठरतात. हवेची गुणवत्ता चांगली असूनही त्याचा आरोग्यावर गंभीर परिणाम होऊ शकतो.
कोल्हापूरसाठी चेतावणी
कोल्हापूरमध्ये पूर्वी पीएम 10 आणि पीएम 2.5 हेच मुख्य प्रदूषक असायचे. आता ओझोन पंधरा दिवसांत चार वेळा मुख्य प्रदूषक होता. त्यामुळे दिल्लीसारखी परिस्थिती टाळायची असेल तर भूपृष्ठीय ओझोन नियंत्रणावर लक्ष केंद्रित करणे गरजेचे आहे.
मानवाच्या आरोग्यावर परिणाम
भूपृष्ठीय ओझोन हा अत्यंत ऑक्सिडंट गॅस असून तो श्वसनमार्गातील पेशींना जळजळ निर्माण करतो. त्यामुळे श्वास घेताना त्रास, छातीत जडपणा, कोरडा खोकला, घसा खवखवणे आणि दम्याच्या झटक्यांची तीव्रता वाढणे अशी लक्षणे दिसतात.