Land Acquisition Process Initiated for Khidrapur-Jugul Bridge; Work Set to Commence Within Two Months
कुरुंदवाड : पुढारी वृत्तसेवा
खिद्रापूर (ता. शिरोळ) येथील जुगुळ पुलासाठी आवश्यक असलेल्या शेतजमिनीपैकी उर्वरित एक गट क्रमांक हस्तांतरित करण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने ‘कंपल्सरी’ प्रक्रिया सुरू केली आहे, ही प्रक्रिया येत्या दोन महिन्यांत पूर्ण होऊन कामाला सुरुवात होणार आहे.
या प्रकल्पासाठी तीन गट क्रमांकांची जमीन हस्तांतर झाली असून एका गटाचे हस्तांतर रखडल्याने कामाला विलंब झाला आहे. बांधकाम विभागाने शेतमालकाला खरेदी दस्त नोंदणीसाठी उपस्थित राहण्याची नोटीस दिली होती, नोटीस कालावधी पूर्ण झाल्याने मोबदल्याची रक्कम न्यायालयात जमा करणार असून कंपल्सरी प्रक्रियेला सुरवात केली आहे.
ही जमीन हस्तांतरणासाठी सामाजिक कार्यकर्त्यांनी आंदोलन केले होते, आता ‘कंपल्सरी’ प्रक्रियेला सुरुवात झाल्याने पुलाच्या कामाला गती आली आहे.
“खरेदी न झालेल्या गटाची ‘कंपल्सरी’ प्रक्रिया सुरू केली आहे. येत्या दोन महिन्यांत ही प्रक्रिया पूर्ण होऊन पुलाच्या कामाला प्रत्यक्ष सुरुवात होईल.”उपअभियंता रविराज चव्हाण
‘कंपल्सरी’ प्रक्रिया म्हणजे काय?
शासकीय प्रकल्पासाठी जमीन आवश्यक असल्यास तिचे मूल्यांकन करून मोबदला ठरवला जातो. शेतकरी सहमत नसल्यास ही रक्कम न्यायालयात जमा करून जमीन शासनाच्या नावे हस्तांतरित केली जाते. मालकाचा मोबदल्यावर हक्क कायम राहतो. यालाच ‘कंपल्सरी’ प्रक्रिया म्हणतात.