कुरुंदवाड नगरपालिकेच्या उपनगराध्यक्षपदी दीपक गायकवाड यांची निवड  Pudhari
कोल्हापूर

Kurundwad Municipal | कुरुंदवाड नगरपालिकेच्या उपनगराध्यक्षपदी दीपक गायकवाड यांची निवड; स्वीकृत नगरसेवकपदी शुभम जोंग, विजय पाटील

Kolhapur News | सत्ताधारी राजर्षी शाहू विकास आघाडीचे सर्व नगरसेवक वाजत-गाजत सभागृहात दाखल

पुढारी वृत्तसेवा

Kurundwad Deepak Gaikwad Vice President

कुरुंदवाड : कुरुंदवाड नगरपालिकेच्या उपनगराध्यक्षपदी दीपक गायकवाड यांची निवड करण्यात आली. तसेच स्वीकृत नगरसेवकपदी राजर्षी शाहू विकास आघाडीतर्फे शुभम जोंग व राष्ट्रीय काँग्रेसतर्फे विजय पाटील यांची निवड झाली. या निवडीमुळे नगरपालिकेच्या सत्ताकेंद्रात नवचैतन्य निर्माण झाले आहे.

नगरपालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात बुधवारी (दि.१४) सकाळी ११ वाजता ही विशेष सभा नगराध्यक्ष मनीषा डांगे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या सभेस मुख्याधिकारी मनोज कुमार देसाई प्रमुख उपस्थित होते.

सत्ताधारी राजर्षी शाहू विकास आघाडीचे सर्व नगरसेवक वाजत-गाजत सभागृहात दाखल झाले, तर राष्ट्रीय काँग्रेसचे नगरसेवक सभागृहात उपस्थित राहिले होते. निवड प्रक्रिया शांततेत पार पडली असून सर्व निवडी बिनविरोध झाल्या.

सभेच्या पहिल्याच दिवशी नगरसेवक वैभव उगळे यांनी महत्त्वाचा मुद्दा उपस्थित केला. कुरुंदवाड नगरपालिकेमार्फत राबविण्यात येत असलेल्या प्रधानमंत्री आवास योजना अंतर्गत काम पाहणारे अनिकेत भोसले यांना काही कारणास्तव रजेवर पाठवण्यात आले आहे. त्यामुळे योजनेअंतर्गत सुरू असलेल्या घरकुलांच्या कामांवर परिणाम होत असल्याचा मुद्दा त्यांनी मांडला. अनिकेत भोसले यांना तात्काळ पुन्हा रुजू करून घेऊन योजनेच्या कामांना गती द्यावी, अशी मागणी केली. या मागणीवर नगराध्यक्षांनी प्रशासनाने योग्य तो निर्णय घ्यावा, असे निर्देश दिले.

या वेळी राजर्षी शाहू विकास आघाडीचे रमेश भुजुगडे, वैभव उगळे, जवाहर पाटील, अक्षय आलासे, तानाजी आलासे, विशाल पाटील, प्रदीप चव्हाण, दीपक परीट, सुनंदा आलासे, संगीता कर्णाळे, विमल पोमाजे, अलका मधाळे, जुवेरीया गोलंदाज, जयश्री पाटील, अलका पाटील, सुजाता जाधव, रुक्सना बागवान, आयेशा बागवान आदी नगरसेवक उपस्थित होते.

निवडी जाहीर होताच समर्थकांनी फटाक्यांची आतषबाजी व गुलालाची उधळण करत आनंदोत्सव साजरा केला. चार वर्षांनंतर सुरू झालेल्या सक्रिय सभागृहामुळे आता शहरातील रखडलेल्या विकासकामांना वेग मिळेल, अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT