

नागाव/शिरोली पुलाची : शिरोली एमआयडीसी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील गुन्हेगारीचे समूळ उच्चाटन करण्याच्या द़ृष्टीने पोलिसांनी लाड-कोळी टोळीतील पाच सराईत गुन्हेगारांना कोल्हापूर व सांगली जिल्ह्यांतून एक वर्षासाठी हद्दपार केले आहे.
शिरोली एमआयडीसी परिसरात गुंडगिरी, दहशत निर्माण करणे तसेच मालमत्तेविरुद्ध गंभीर स्वरूपाचे गुन्हे केल्याच्या पार्श्वभूमीवर ही पावले उचलण्यात आली आहेत. हद्दपार करण्यात आलेल्यांमध्ये विनायक सुकुमार लाड ऊर्फ कोळी (वय 28, रा. विलासनगर, शिरोली पुलाची) हा टोळी प्रमुख असून, अनिकेत सुकुमार लाड ऊर्फ कोळी (वय 24), आशिष लक्ष्मण वाडकर (वय 28, रा. नागाव), श्रीकांत महादेव कोळी (वय 27, माळवाडी, शिरोली पुलाची) आणि राहुल ऊर्फ आकाश ईश्वर आयवळे (वय 29, शिरोली पुलाची) यांचा समावेश आहे.
या सर्व आरोपींवर बेकायदेशीर शस्त्रे, घातक हत्यारे बाळगणे, नागरिकांमध्ये दहशत निर्माण करणे यांसारखे गंभीर गुन्हे दाखल आहेत. त्यांच्या हालचालींवर पोलिसांनी सातत्याने लक्ष ठेवले होते. ही कारवाई पोलिस अधीक्षक योगेशकुमार गुप्ता, अपर पोलिस अधीक्षक डॉ. धीरज कुमार आणि उपविभागीय पोलिस अधिकारी (करवीर विभाग) सुजितकुमार क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली शिरोली एमआयडीसीचे सहायक पोलिस निरीक्षक सुनील गायकवाड व त्यांच्या पथकाने यशस्वीरीत्या पार पाडली.