

एकनाथ नाईक
कोल्हापूर : शहरात महापालिका रणधुमाळी सुरू आहे. प्रचार शिगेला पोहोचला असून उमेदवारीपासून ते ग्रासरुटपर्यंतच्या प्रचारात तरुणाई आघाडीवर आहे. विशेष बाब म्हणजे यंदा तब्बल 4 हजार 6 जेन झी (2012 पूर्वी जन्मलेले) नवमतदारांची भर पडली आहे. विधानसभा निवडणुकीनंतर अद्ययावत करण्यात आलेल्या आणि 1 जुलै 2025 पर्यंत ग्राह्य धरलेल्या मतदार यादीत या नव्या मतदारांचा समावेश झाला आहे. आगामी कोल्हापूर महानगरपालिका निवडणुकीत हे सर्व मतदार पहिल्यांदाच मतदानाचा हक्क बजावणार असून, त्यामुळे शहराच्या स्थानिक राजकारणात नव्या विचारांचा प्रभाव दिसण्याची शक्यता आहे. दरम्यान, महापालिकेसाठी 4 लाख 94 हजार 711 मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत.
या नव्या मतदारांमध्ये 2 हजार 280 महिला, 1 हजार 724 पुरुष आणि 2 तृतीयपंथी मतदारांचा समावेश आहे. एकूण संख्येत महिलांचा वाटा अधिक असून, हा सहभाग लोकशाही प्रक्रियेला बळ देणारा ठरत आहे. डिजिटल युगात वाढलेली, सामाजिक माध्यमांशी सतत जोडलेली जेन झी पिढी मतदान प्रक्रियेत सक्रिय होत असल्याने निवडणुकीतील मुद्दे, प्रचाराची भाषा आणि राजकीय संवाद यामध्येही बदल अपेक्षित आहे.
कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघातील शहरातील 186 मतदान केंद्रांवर 2 हजार 393 नव मतदारांची नोंद झाली आहे. यामध्ये 986 पुरुष, 1 हजार 404 महिला आणि 2 तृतीयपंथी मतदारांचा समावेश आहे; तर कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघात 1 हजार 613 नव मतदार वाढले असून, त्यात 738 पुरुष आणि 875 महिला मतदार आहेत.
महानगरपालिकेची निवडणूक बहुसदस्य प्रभाग पद्धतीनुसार प्रथमच होणार असून, नवमतदार प्रभागनिहाय मतदान करणार आहेत. पहिल्यांदाच मतदानाचा अनुभव घेणार्या या जेन झी मतदारांचा उत्साह, प्रश्न विचारण्याची वृत्ती आणि अपेक्षा यामुळे महापालिकेच्या राजकारणाला नवा आयाम मिळण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
जेन झी (जनरेशन झेड) म्हणजे साधारणतः 1997 ते 2012 दरम्यान जन्मलेली पिढी. ही पिढी जन्मापासूनच इंटरनेट, स्मार्टफोन, सोशल मीडिया आणि डिजिटल तंत्रज्ञानाच्या सान्निध्यात वाढलेली असल्याने त्यांना डिजिटल नेटिव्हज् असेही म्हटले जाते. ही पिढी करिअर, ओळख आणि स्वातंत्र्याबाबत अधिक जागरूक असून सामाजिक न्याय, पर्यावरण, मानसिक आरोग्य आणि समानतेसारख्या मुद्द्यांवर ठाम भूमिका घेते. यामुळे राजकारणातही जेन झीचा सहभाग वाढत आहे.