कुरुंदवाड : शहरातील सरकारी दवाखाना रस्ता, पालिका चौक तसेच नवबाग परिसर अतिक्रमणाच्या विळख्यात Pudhari
कोल्हापूर

Kurundwad Encroachment | कुरुंदवाड शहरातील प्रमुख रस्ते अतिक्रमणाच्या विळख्यात; नागरिकांची कारवाईची मागणी

सरकारी दवाखाना रस्ता, पालिका चौक व नवबाग परिसरात वाहतूक कोंडी; पार्किंगवरून वाद, दमदाटीच्या प्रकारात वाढ

पुढारी वृत्तसेवा

Kurundwad Road Encroachment Issues

कुरुंदवाड : शहरातील सरकारी दवाखाना रस्ता, पालिका चौक तसेच नवबाग परिसर अतिक्रमणाच्या विळख्यात सापडला आहे. या भागांना अतिक्रमणमुक्त करून ‘श्वासमुक्त’ करावे, अशी जोरदार मागणी नागरिकांतून होत आहे. वाढत्या बेकायदेशीर पार्किंगमुळे वाहतूक कोंडी, अपघाताचा धोका आणि नागरिकांमध्ये वादाचे प्रकार दिवसेंदिवस वाढत आहेत.

दरम्यान, पालिका चौकातच अतिक्रमणाने डोके वर काढले आहे, तर शहरात ही यापेक्षा विदारक स्थिती आहे. पालिका कार्यालयात अधिकृत पार्किंगची व्यवस्था नसतानाही अनेक वाहनधारक आपली वाहने बाहेरील रस्त्यांवर, विशेषतः बँकेसमोरील मार्गावर उभी करत आहेत.

याठिकाणी हातगाड्यांचे असणारे अतिक्रमणामुळे वाहने रस्त्यावर उभी करावी लागत आहेत. रुंदी कमी होऊन नागरिकांना ये-जा करणे अत्यंत कठीण बनले आहे. यापेक्षाही गंभीर बाब म्हणजे, काही अतिक्रमित हातगाडेवाल्यांकडून नागरिकांना वाहने काढण्यासाठी दमदाटी केली जात असल्याच्या तक्रारी समोर येत आहेत.

पालिका चौक हा शहरातील अत्यंत वर्दळीचा भाग असून येथे अनेक वेळा अपघाताचे प्रसंग घडले आहेत. पार्किंगच्या कारणावरून वादावादी वाढून आता हमरी-तुमरीपर्यंत प्रकार पोहोचत असल्याने कायदा व सुव्यवस्थेचाही प्रश्न निर्माण होत आहे.

नवबाग रस्त्यावर खाऊगाड्यांसमोर दुचाकींचे अनियमित पार्किंग होत असल्याने वाहतुकीला मोठा अडथळा निर्माण होत आहे. काही वाहने कायमस्वरूपीच रस्त्यावर उभी राहत असल्याने त्या ठिकाणी अतिक्रमणाचे स्वरूप तयार झाले आहे. परिणामी, या मार्गावर नेहमीच वाहतूक विस्कळीत होत असल्याची नागरिकांची तक्रार आहे.

सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार सार्वजनिक रस्त्यांवरील अतिक्रमण हटविणे बंधनकारक असतानाही पालिका प्रशासनाकडून ठोस कारवाई होत नसल्याबद्दल नाराजी व्यक्त केली जात आहे. राजकीय दबावामुळे अतिक्रमण हटाव मोहीम पुढे ढकलली जात असल्याची चर्चा शहरात रंगू लागली आहे. तातडीने अतिक्रमण हटवून वाहतुकीला शिस्त लावावी, अशी मागणी नागरिकांतून होत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT