कोल्हापूर

कृष्णा जलवाहिनीसाठी जुन्या २१ झाडांची कत्तल

शिरढोण येथील प्रकार; ग्रामस्थांत संताप

पुढारी वृत्तसेवा

शिरढोण : येथे इचलकरंजी कृष्णा नळ योजनेच्या जलवाहिनीसाठी २१ जुन्या झाडांची कत्तल सुरू असून ग्रामस्थांत तीव्र संताप व्यक्त होत आहे. जलवाहिनीला अडथळा ठरत असल्याचे कारण देत वन विभागाने झाडे तोडण्यास परवानगी दिली आहे. मात्र काही झाडे अडथळा नसतानाही तोडली जात असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.

इचलकरंजी शहरासाठी बस्तवाड येथील कृष्णा नदीतून पाणी आणण्याची योजना राबवली जात असून, वारंवार गळती होत असल्याने नवीन जलवाहिनी टाकण्याचे काम सुरू आहे. शिरढोण बसथांबा ते माळभाग या सुमारे १२०० मीटर मार्गावर ही कामे सुरू आहेत. या परिसरात विविध प्रकारची जुनी झाडे असून त्यामुळे नैसर्गिक सावली व जमिनीची धूप रोखली जात होती.

झाडे तोडण्याचा ठेका बाळू निवृत्ती चव्हाण (आगर) यांना देण्यात आला आहे. ग्रामपंचायतीला माहिती न देता काम सुरू केले आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने मात्र आवश्यक परवानग्या घेतल्याचा दावा केला आहे. मात्र इचलकरंजी महानगरपालिका व सार्वजनिक बांधकाम विभागाच्या संगनमताने हे चुकीचे काम होत असल्याचा आरोप नागरिकांतून होत आहे.

तोडण्यात येणाऱ्या झाडांमध्ये पिंपळ, उंबर, चिंच, लिंब, रेन ट्री, करंज आणि सुबाभूळ यांचा समावेश आहे. शासनाच्या वृक्षलागवड मोहिमेच्या पार्श्वभूमीवर ही कारवाई होत असल्याने नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT