कोल्हापूर : विज्ञान युगात उद्योग, व्यापार आणि कृषी क्षेत्रांतील प्रत्येकाने बदल स्वीकारले पाहिजेत. बदल न स्वीकारल्यामुळे अनेक आंतरराष्ट्रीय कंपन्या इतिहासजमा झाल्या. कोल्हापुरी चप्पल उद्योगानेही काळानुरूप परिवर्तन करावे. अन्यथा तर आपण नामशेष होऊ, असा इशारा महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री अँड अॅग्रीकल्चरचे अध्यक्ष रवींद्र माणगावे यांनी दिला.
कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजच्या सभागृहात कोल्हापुरी चप्पल उत्पादक, कारागीर आणि व्यावसायिकांसाठी आयोजित कार्यशाळेत ते बोलत होते. माणगावे म्हणाले, कोल्हापुरी चप्पल ही केवळ परंपरा नाही, तर कोल्हापूरचा जागतिक ओळख निर्माण करणारा वारसा आहे. या वारशाचे संरक्षण आणि संवर्धन करण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा स्वीकार करणे अत्यावश्यक आहे.
क्यूआर कोड, एनएफसी चीप आणि ब्लॉकचेन प्रणालीमुळे चप्पलचा मूळ दर्जा, उत्पादक आणि कारागीर यांची खरी माहिती थेट ग्राहकांपर्यंत पोहोचेल. या प्रणालीमुळे नकली चप्पल विक्री थांबेल आणि कारागिरांना त्यांच्या कौशल्याचे योग्य मूल्य मिळेल. महाराष्ट्र चेंबर या बदलात कोल्हापुरी उद्योगाला सर्वतोपरी सहकार्य करेल, अशी ग्वाही माणगावे यांनी दिली.
महाराष्ट्र चेंबरने आगामी एका वर्षात राज्यातील प्रत्येक गावातून ३६ हजार उद्योजक घडविण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे, अशी माहिती त्यांनी दिली. कार्यशाळेत इमरटेक इनोव्हेशनचे गौरव सोमवंशी यांनी क्यूआर कोड एनएफसी चीप आणि ब्लॉकचेन तंत्रज्ञानाचे प्रत्यक्ष सादरीकरण केले. या तंत्रज्ञानामुळे उत्पादक, विक्रेते आणि ग्राहक यांना होणारे फायदे त्यांनी स्पष्ट केले.
कोल्हापूर चेंबरचे अध्यक्ष संजय शेटे यांनी स्वागत व प्रास्ताविकात जवाहरनगर येथील कातडी कमावण्याचा उद्योग बंद झाल्याने कोल्हापुरी चप्पलसाठी लागणारे कातडे दक्षिण भारतातून मागवावे लागते. तसेच, सुभाषनगर येथील लीडकॉमचे कार्य पद्धतशीरपणे व पारदर्शक व्हावे, यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे, असे सांगितले. कोल्हापूर चेंबरचे उपाध्यक्ष धनंजय दुग्गे, यांनी आभार मानले. मानद सचिव प्रशांत शिंदे यांनी सूत्रसंचालन केले.
यावेळी इमरटेक इनोव्हेशन प्रा. लि. चे मुख्य कार्यकारी अधिकारी गौरव सोमवंशी, महाराष्ट्र चेंबरचे शेखर घोडके, राजू पाटील, चेंबरचे मानद सचिव जयेश ओसवाल, अजित कोठारी, खजानीस राहुल नष्टे, संचालक शिवाजीराव पोवार, संपत पाटील, अनिल धडाम, अविनाश नासिपुडे, अशोक गायकवाड, शशिकांत व्हटकर, बाळकृष्ण गवळी, शिवाजी माने, मारुती गवळी आदी उपस्थित होते.
चर्मोद्योगात ब्लॉकचेन तंत्रज्ञानामुळे संपूर्ण उत्पादन साखळी पारदर्शक, विश्वासार्ह आणि सुरक्षित बनते. चामडी कुठून आली, ती प्रक्रिया कुठे झाली, कोणत्या कारागिराने वस्तू तयार केली आणि ती कोणत्या विक्रेत्याने विकली, या सर्व माहितीची अचूक नोंद ब्लॉकचेनवर होते. ही नोंद बदलता येत नाही, त्यामुळे नकली उत्पादने आणि फसवणूक रोखता येते.
ग्राहकाला उत्पादनाविषयी संपूर्ण माहिती मिळते, त्यामुळे विश्वास आणि ब्रँड व्हॅल्यू वाढते. कारागीर आणि उत्पादकांना त्यांच्या कामाची डिजिटल ओळख मिळते, ज्यामुळे योग्य दर आणि बाजारपेठेत थेट प्रवेश शक्य होतो. शासन व संस्थांना उद्योगातील गुणवत्ता नियंत्रण आणि निर्यात व्यवस्थापन अधिक सुलभ होते.