

कोल्हापूर : कोल्हापुरी चप्पल हे केवळ चर्मकार कारागिरांनी बनवलेले एक उत्पादन नाही, तर कोल्हापूरकरांचे या चप्पलसोबत भावनिक नातं आहे. कोल्हापूरच्या वैशिष्ट्यांमध्ये या चपलेचे स्थान अग्रभागी आहे. त्यामुळे भविष्यात प्राडासारख्या जगद्विख्यात ब—ँडसोबत कोल्हापूरचे नाव जोडले जाणार असेल, तर तो कोल्हापूरकरांसाठी अभिमान आहे. या चपलेच्या दर्जा व गुणवत्तेच्या आधारे भविष्यात करार करण्याचे संकेत प्राडाच्या शिष्टमंडळाकडून मिळाले आहेत. यानिमित्ताने प्राडा आणि कोल्हापुरी चप्पल यांच्यात जागतिक वीण जुळेल असा विश्वास जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी व्यक्त केला.
कोल्हापूर दौर्याअंतर्गत बुधवारी प्राडा कंपनीच्या पाओलो टिव्हरॉन, डॅनियल कोंटू, आंद्रिया पोलास्ट्रेली, रॉबर्टो पोलास्ट्रेली या सदस्यांनी येडगे यांची भेट घेऊन कोल्हापुरी चप्पल व इतर पारंपरिक वस्तूंबाबत चर्चा केली. कोल्हापुरी चप्पलसंबंधी सुरू असलेल्या विविध प्रकल्पांची माहिती जिल्हाधिकारी येडगे यांनी शिष्टमंडळाला दिली. यावेळी महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजचे अध्यक्ष ललित गांधी, जिल्हा उद्योग केंद्राचे उद्योग अधिकारी बालाजी बिराजदार आणि मेघ गांधी उपस्थित होते.
येडगे म्हणाले, कोल्हापुरी चप्पल या स्थानिक कारागिरांच्या कौशल्याचे प्रतीक आहेत. गेल्या सातशे वर्षांची परंपरा असलेल्या कोल्हापुरी चप्पल निर्मितीत चर्मकार समाजाच्या कित्येक पिढ्यांनी वारसा जपला आहे. प्राडासारख्या आंतरराष्ट्रीय ब—ँडच्या नकाशावर कोल्हापुरी चपलेचा समावेश होणार असेल, तर ते कारागिरांचे श्रेय आहे. यावेळी त्यांनी कोल्हापुरी साज, ठुशी आदी पारंपरिक वस्तूंची माहिती दिली. यावेळी शिष्टमंडळाने सांगितले की, भविष्यात कंपनीमार्फत येथील पारंपरिक वस्तू उत्पादन गुणवत्ता वाढवून आंतरराष्ट्रीय स्तरावर नेण्यासाठी करार करण्याचा विचार केला जाऊ शकतो. कंपनीच्या बोर्ड मिटिंगमध्ये निर्णय झाल्यानंतर जिल्हा प्रशासनासह संबंधित बोर्ड ऑफ असोसिएशन तसेच उत्पादक कंपन्यांना कळविण्यात येईल.
कोल्हापुरी चपलेतील वैविध्य तसेच पारंपरिक आणि आधुनिक यांची अचूक सांगड घालत तयार झालेल्या नव्या डिझाईन्सची कल्पकता पाहून प्राडा कंपनीची टीम भारावून गेली. बुधवारी सकाळी पापाची तिकटी परिसरातील चप्पल लाईनला टीमने भेट दिली. यावेळी ग्राहकांच्या अपेक्षा, मागणी, पुरवठा यांचे आर्थिक गणितही प्राडाच्या सदस्यांनी जाणून घेतले. यावेळी खिशात मावणार्या कोल्हापुरी चपलेने प्राडाच्या तंत्रज्ञांचेही मन जिंकले. यावेळी उत्पादक व विक्रेते भूपाल शेटे, शिवाजीराव पोवार, महेश भोसले, राजन सातपुते, मनोज गवळी, रोहित गवळी यांनी चप्पल विक्री व्यवसायाची माहिती दिली. यावेळी चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष संजय शेटे, उद्योजक जयेश ओसवाल उपस्थित होते.