Vishalgad Urus Forest Department Security
सुभाष पाटील
विशाळगड : ऐतिहासिक किल्ले विशाळगड येथे सध्या उरूसानिमित्त भाविकांची मोठी मांदियाळी पाहायला मिळत आहे. गडावर दर्शनासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून लोक येत असून, प्रशासनाकडून सुरक्षेच्या दृष्टीने कडक पावले उचलली जात आहेत. विशेषतः गडाचा पायथा वनविभागाच्या अखत्यारीत येत असल्याने, यंदा वनविभागाने वाहतूक नियोजनाबाबत अत्यंत कठोर भूमिका घेतली आहे.
दरवर्षी उरूसानिमित्त गडाच्या पायथ्याला वाहने नेण्याची मुभा असायची, ज्यामुळे पायथ्यालाच वाहनतळ उभारले जात असे. मात्र, गेल्या काही काळात वनविभागाने राबवलेली अतिक्रमणविरोधी मोहीम आणि पर्यावरणाचे संरक्षण लक्षात घेता, यंदा वन विभागाने उभारलेल्या कमानीच्या आत वाहने लावण्यास पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे.
पायथ्याचा परिसर वनविभागाच्या हद्दीत येत असल्याने, कोणत्याही प्रकारचे अनधिकृत पार्किंग किंवा पुन्हा अतिक्रमण होऊ नये, भाविकांची गैरसोय टाळण्यासाठी आणि नियमांचे उल्लंघन होऊ नये यासाठी वनविभागाचे विशेष पथक गडाच्या पायथ्याशी ठाण मांडून आहे. परिसरात चोख बंदोबस्त लावण्यात आला असून, येणाऱ्या प्रत्येक वाहनावर नजर ठेवली जात आहे. गडावर जाणारे सर्व भाविक आता आपली वाहने गडाच्या पायथ्याशी असलेल्या निश्चित केलेल्या जागेत उभी करून पुढील प्रवास पायी करत आहेत.
वनविभागाने गड पायथा परिसरातील अतिक्रमण हटवून हा भाग मोकळा केला होता. त्या जागेचे मूळ स्वरूप टिकवून ठेवण्यासाठी आणि गर्दीवर नियंत्रण मिळवण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.
सध्या गडावर गर्दी वाढत असल्याने वाहतूक कोंडी होऊ नये, यासाठी भाविकांनी वनविभागाच्या सूचनांचे पालन करावे आणि सहकार्य करावे, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. किशोर आहिरे (RFO पेंडाखळे), पी.एन.डफडे ( वनपाल ये. जुगाई), नम्रता दांडगीदास (वनरक्षक विशाळगड), संगम खुपसे (वनरक्षक येळवण जुगाई), आदीसह वनमजूर चोख बंदोबस्त करत बारीक आहेत.