

विशाळगड : ऐतिहासिक किल्ले विशाळगड येथील उरुस आणि बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने सुरक्षेच्या दृष्टीने अत्यंत कठोर पावले उचलली आहेत. विशाळगड हे राज्य संरक्षित स्मारक असल्याने, या परिसरात कोणत्याही प्रकारच्या पशुहत्येला किंवा पशुबळीला सक्त मनाई करण्यात आली आहे, अशी माहिती तहसीलदार सीमा सोनवणे व पोलीस निरीक्षक राजेंद्र सावंत्रे यांनी पत्रकार परिषदेत दिली. स्मारकाचे विद्रुपीकरण टाळण्यासाठी पुरातत्व विभागाने कुर्बानी व महाप्रसादासाठी 'नाहरकत प्रमाणपत्र' नाकारले आहे.
कायद्याचा बडगा आणि नाकाबंदी:
पुरातत्व नियम १९६२ मधील कलम ८ (क) नुसार स्मारक परिसरात अन्न शिजवण्यास बंदी असून, उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार सार्वजनिक ठिकाणी पशुबळी देण्यास मनाई आहे. कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी २७ मे ते १ जून २०२६ या कालावधीत गडावर कडक बंदोबस्त तैनात असेल. आंबा मार्ग, पावनखिंड मार्ग आणि केंबुर्णेवाडी येथे विशेष नाकाबंदी करण्यात आली असून, येथे तसेच पायथ्याशी प्रत्येक पर्यटकाची सखोल तपासणी केली जाईल.
"भाविकांनी कायदा व सुव्यस्थेचा प्रश्न निर्माण होईल असे कृत्य करु नये. गडाचे पावित्र्य राखणे हे प्रत्येक भाविकांचे आद्य कर्तव्य आहे. भाविकांनी धार्मिक सलोखा राखून प्रशासनाला सहकार्य करावे. कायद्याचे उल्लंघन करणाऱ्यांची गय केली जाणार नाही."
— सीमा सोनवणे (तहसीलदार, शाहूवाडी)
"कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी गडावर पोलीस यंत्रणा सज्ज करण्यात आली आहे. प्रत्येक भाविक व पर्यटकांची कसून चौकशी केली जाईल. भाविकांनी कायद्याचे पालन करावे आणि प्रशासनाला सहकार्य करावे
— राजेंद्र सावंत्रे (पोलीस निरीक्षक, शाहूवाडी)