Kolhapur News 
कोल्हापूर

Kolhapur Black Magic | पुरोगामी कोल्हापूरात चाललंय काय? भानामती करायला आले अन् गावकऱ्यांनी पकडले; पुढे जे घडले ते धक्कादायक

Kolhapur Black Magic | कोल्हापूर जिल्ह्यातील तरदऱ्याचे वडगाव येथे स्मशानभूमीत भानामती करण्यासाठी आलेल्या दोघांना ग्रामस्थांनी रंगेहाथ पकडल्याची घटना घडली आहे.

पुढारी वृत्तसेवा

  1. तरदऱ्याचे वडगाव येथे स्मशानभूमीत भानामती करताना दोघे रंगेहाथ पकडले

  2. पकडलेल्यांमध्ये एका तृतीयपंथीयाचा समावेश; अन्य तीन साथीदार पसार

  3. स्मशानभूमीत गुलाल, टाचणी टोचलेली लिंबू, फोटो व पूजासाहित्य आढळले

  4. पाणीपुरवठा संस्थेच्या निवडणुकीच्या आदल्या दिवशीच घटना घडल्याने खळबळ

  5. विठ्ठल सहकारी पाणीपुरवठा संस्थेसाठी आज मतदान, गावात तणावाचे वातावरण

कोल्हापूर जिल्ह्यातील तरदऱ्याचे वडगाव येथे स्मशानभूमीत भानामती करण्यासाठी आलेल्या दोघांना ग्रामस्थांनी रंगेहाथ पकडल्याची घटना घडली आहे. या घटनेमुळे गावात एकच खळबळ उडाली आहे. पकडण्यात आलेल्या दोघांमध्ये एका तृतीयपंथीयाचाही समावेश असल्याची माहिती समोर आली आहे.

मात्र या प्रकरणातील अन्य तीन साथीदार घटनास्थळावरून पसार झाले आहेत. ग्रामस्थांनी वेळेवर सतर्कता दाखवल्याने हा प्रकार उघडकीस आला.

स्मशानभूमीत गुलाल, टाचणी टोचलेली लिंबू, काही छायाचित्रे तसेच अन्य पूजासाहित्य ठेवून पूजा सुरू असल्याचे ग्रामस्थांच्या निदर्शनास आले. या संशयास्पद प्रकाराची माहिती मिळताच ग्रामस्थांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत संबंधित दोघांना पकडले.

विशेष म्हणजे, ही घटना गावातील पाणीपुरवठा संस्थेच्या निवडणुकीच्या अगदी आदल्या दिवशी घडल्याने अनेक तर्कवितर्कांना उधाण आले आहे. काही नागरिकांनी या प्रकारामागे राजकीय किंवा निवडणूकसंबंधित दबाव निर्माण करण्याचा उद्देश असण्याची शक्यता व्यक्त केली आहे.

दरम्यान, गावातील विठ्ठल सहकारी पाणीपुरवठा संस्थेसाठी आज मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. या पार्श्वभूमीवर घडलेल्या घटनेमुळे गावात भीती आणि संशयाचे वातावरण निर्माण झाले असून प्रशासनाने या प्रकरणाची गंभीर दखल घ्यावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT