

कोल्हापूर : कोल्हापूर महानगरपालिकेत महायुतीला घवघवीत यश मिळाले असून महापौर महायुतीचा होणार आहे; मात्र निवडीसाठी अद्याप एक महिना अवधी आहे. या काळात घटक पक्षांनी प्रत्येक पक्षाचा गट नेता निवडून एक महिन्यात नोंदणी करावी, असे आवाहन वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांनी केले.
भारतीय जनता पक्ष, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या महायुतीतर्फे नवनिर्वाचित नगरसेवकांच्या सत्कारप्रसंगी ते बोलत होते. यावेळी महायुतीच्या 45 नगरसेवकांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. मंत्री मुश्रीफ म्हणाले, नूतन नगरसेवकांनी आपण दिलेला वचननामा वाचून काढा. जनतेचे आभार माना. महापौर निवडीसाठी 10 ते 15 दिवस गॅझेट होण्यासाठी, तर सात ते आठ दिवस नोटीस मिळण्यासाठी जाणार आहेत. त्यामुळे महापौर निवड महिन्यानंतर होणार आहे. याबरोबरच प्रत्येक घटक पक्षाची आणि नगरसेवकांची कमिटी स्थापन करावी, भानगडी असतात. भानगडी म्हणजे तशा अर्थाने नव्हे. जनतेची कामे असतात. ती मार्गी लावली पाहिजेत.
महापालिकेत आपले वर्तन चांगले ठेवा. काही शंका, वाद असतील तर पार्टी मिटिंगमध्ये समन्वयाने बोला. सभागृहात अथवा बाहेर चर्चा करा. चव्हाट्यावर काही आणू नका. बदनामी होईल असे वर्तन करू नका. प्रभागातील समस्यांसह शहराच्या प्रश्नांवर लक्ष केंद्रित करा. आगामी अधिवेशनात कोल्हापूरला भरपूर निधी मिळेल, अशी ग्वाही त्यांनी दिली. खा. धनंजय महाडिक म्हणाले, जनतेने आपल्यास आशीर्वाद दिला आहे. विकासाचा संकल्प सत्यात आणून पाच वर्षांत प्रभागाचा कायापाटल करावा. 2030 पर्यंतचा रोड मॅप करून कोल्हापूर डेव्हलपमेंट अॅक्शन कमिटीसह विविध विभागाच्या समित्यांचा थिंक टँक तयार करणार आहोत. एकमेकांवर खापर फोडू नका. तक्रारी न करता प्रत्येकाने आपला पक्ष मजबूत करावा. नगरसेवकांसाठी वॉर रूम तयार करणार आहोत.
राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष आमदार राजेश क्षीरसागर म्हणाले, पक्ष न म्हणता महायुती म्हणून सामोरे गेल्याने यश मिळाले. 65 उमेदवार विजयी होतील अशी अपेक्षा होती; मात्र उमेदवारांत समन्वय नसल्याने अनेक ठिकाणी फटका बसला. महायुतीची शिस्त पाळून काम करावे. निधी कमी पडू देणार नाही. पालकमंत्री प्रकाश आबिटकर म्हणाले, जनतेने संधी दिली आहे. चांगले काम करूया. आनंदोत्सव करताना पराभवाचे चिंतनही करूया. शहरातील विकासकामांसाठी येणार्या अर्थसंकल्पात मोठी तरतूद करू.
यावेळी प्रा. जयंत पाटील, भाजपचे प्रदेश सचिव महेश जाधव यांची भाषणे झाली. महानगर जिल्हाध्यक्ष विजय जाधव यांनी प्रास्ताविक केले. कार्यक्रमास माजी खासदार प्रा. संजय मंडलिक, शिवसेनेचे सत्यजित कदम, सुजित चव्हाण, सुनील कदम, राष्ट्रवादी काँग्रेसचे आदिल फरास, भाजपचे राहुल चिकोडे आदींसह घटक पक्षांतील कार्यकर्ते उपस्थित होते.
तुम्ही पराक्रमी नव्हे, सहानुभूतीने एवढ्या जागा मिळाल्या
आ. सतेज पाटील यांना सहानुभूती आणि क्रॉस व्होटींगमुळे एवढ्या जागा मिळाल्या आहेत. त्यामुळे त्यांनी आपण पराक्रमी आहोत, असे समजू नये, असा खोचक टोला मंत्री मुश्रीफ यांनी आ. पाटील यांना लगावला. विरोधकांना निधी हवा असेल, तर ते आम्हाला पाठिंबा देतील. जिल्हा परिषदेसाठी काही ठिकाणी युती होईल. जेथे युती नाही तेथे मैत्रीपूर्ण लढत होईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.