किणी, पुढारी वृत्तसेवा : तळसंदे (ता.हातकणंगले) येथे वळणावर चालकाचा ताबा सुटल्याने सिमेंटचे केमिकल वाहतूक करणारा टँकर रस्त्याच्या मध्यभागी पलटी झाला. यामुळे मध्यरात्री १ वाजल्यापासून पासून वाठार- वारणानगर रोडवरील वाहतूक ठप्प आहे. बारा तासांहून अधिक काळ रस्त्यावरून टँकर हटविण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत.
याबाबत अधिक माहिती अशी की, काँक्रीट मिक्सरचे केमिकल घेऊन कंटेनर सोलापूरहून रत्नागिरीकडे चालला होता. रात्री एकच्या सुमारास चालकास वळणाचा अंदाज न आल्याने शामराव पाटील शिक्षण समूहासमोर चालकाचा ताबा सुटल्याने टँकर पलटी झाला. त्यामुळे सुमारे तीन किलोमीटरच्या वाहनांच्या रांगा दोन्ही बाजूस लागल्या होत्या. घटनास्थळी वडगाव पोलीस ठाणे व महामार्ग पोलिसांचे पथक दाखल झाले. क्रेनच्या सहाय्याने टँकर हटविण्याचे काम रात्रीपासून सुरू होते. आज (दि.२८) दुपारपर्यंत म्हणजे १४ तासांहून अधिक वेळ हे प्रयत्न सुरू आहेत. मात्र यश आलेले नाही.
अपघातग्रस्त वाहनाचे नुकसान झाले असून चालक जखमी झाला आहे. प्रवाशांनी पर्यायी वाहतूक रस्त्याचा मार्ग अवलंबला आहे. सकाळी वेळेत पोहोचण्यासाठी नोकरदारांची तारांबळ उडाली. वारणानगरहून येणारी वाहने पारगाव-पाडळी-अंबप व राष्ट्रीय महामार्ग अशी वळवण्यात आली. तर वाठारकडून येणारी वाहने तळसंदे -जुने चावरे- जुने पारगाव -नवे पारगाव अशी वळविण्यात आली आहेत. तर तळसंदे गावाच्या दुतर्फा अवजड वाहनांच्या चार किलोमीटरहून अधिक रांगा लागल्या आहेत.
हेही वाचा