रुपाली शिसाळ दवाखान्यातून पेपर सोडविताना  Pudhari
कोल्हापूर

Kolhapur News | आजारपणावर मात करत चरणच्या रुपालीने रूग्णालयातून दिला बारावीचा पेपर

HSC Exam 2026 | प्रकृती अस्वास्थ्यामुळे सरूड येथील परीक्षा केंद्रावर प्रत्यक्ष उपस्थित राहणे शक्य नसल्याने रूग्णालयातून पेपर लिहिण्याची परवानगी

पुढारी वृत्तसेवा

Student gives exam from hospital

बांबवडे : चरण (ता. शाहूवाडी) येथील विद्यार्थिनी रुपाली नामदेव शिसाळ हिने आजारपणावर मात करत बारावीच्या जीवशास्त्राच्या बोर्ड परीक्षेला दवाखान्यातूनच सामोरे जात आपले शैक्षणिक नुकसान टाळले. अधिकाऱ्यांच्या तत्परतेमुळे ही परीक्षा सुरळीत पार पडली.

रुपाली ही डोणोली येथे इयत्ता १२ वीमध्ये शिक्षण घेत आहे. सध्या बारावीच्या बोर्ड परीक्षा सुरू असून तिचा जीवशास्त्र विषयाचा पेपर नियोजित होता. मात्र, सोमवारी (दि. २३ ) ती अचानक आजारी पडल्याने तिला बांबवडे येथील खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. प्रकृती अस्वास्थ्यामुळे तिला सरूड येथील परीक्षा केंद्रावर प्रत्यक्ष उपस्थित राहणे शक्य नव्हते.

रुपालीचे वडील नामदेव शिसाळ यांनी तात्काळ केंद्रप्रमुख के. एन. पाटील यांची भेट घेऊन परिस्थितीची माहिती दिली. केंद्रप्रमुखांनी गटशिक्षणाधिकारी विश्वास सुतार यांच्याशी संपर्क साधून घडलेली घटना कळविली. त्यानंतर बोर्ड अध्यक्ष राजेश शिरसागर यांना याबाबत माहिती देण्यात आली. संबंधित अधिकाऱ्यांनी त्वरित निर्णय घेत दवाखान्यातच परीक्षा घेण्याच्या सूचना दिल्या.

तालुका शिक्षण विभागाने आवश्यक ती तयारी पूर्ण करून हॉस्पिटलमध्येच परीक्षा घेण्याची व्यवस्था केली. केंद्रप्रमुख के. एन. पाटील आणि पर्यवेक्षक उदय पाटील यांच्या उपस्थितीत शांत आणि नियमबद्ध वातावरणात रुपालीने जीवशास्त्राचा पेपर पूर्ण केला. प्रकृती अस्वस्थ असतानाही रुपालीने धैर्य दाखवत परीक्षा दिली आणि तिचे शैक्षणिक वर्ष वाया जाण्यापासून वाचले.

केंद्र संचालकांकडून माहिती मिळताच आम्ही बोर्ड अध्यक्षांशी संपर्क साधला. त्यांनी परिस्थितीची गांभीर्याने दखल घेत दवाखान्यातच परीक्षा घेण्याच्या सूचना दिल्या. त्यानुसार आवश्यक ती कार्यवाही करून रुपालीला दवाखान्यातूनच पेपर देता आला.
- विश्वास सुतार (गटशिक्षणाधिकारी, शाहूवाडी)
माझी मुलगी आजारी पडल्यामुळे तिचे शैक्षणिक नुकसान होईल की काय, अशी भीती होती. मात्र शाळा व शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या सहकार्यामुळेच ती परीक्षा देऊ शकली.
- नामदेव शिसाळ (वडील)

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT