शिरोळ, नृसिंहवाडी: पुढारी वृत्तसेवा: जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथे मराठा आरक्षणासाठी सुरू असलेल्या उपोषणावेळी पोलीस प्रशासनाने आंदोलकांवर केलेल्या लाठीचार्ज व गोळीबाराच्या निषेधार्थ आज (दि.४) शिरोळ तालुक्यातील मराठा समाजाच्या वतीने शिरोळ तहसील कार्यलयावर निषेध मोर्चा काढण्यात आला. यावेळी आंदोलकांनी मराठा समाज्याच्या संतप्त भावना शासनाला कळवाव्यात, अशी मागणी तहसीलदार अनिलकुमार हेळकर यांच्याकडे केली. दरम्यान, तहसीलदार हेळकर यांनी मराठा समाजबांधवांच्या तीव्र भावना जिल्हाधिकारी यांच्याकडे कळवू असे सांगितले. (Kolhapur Maratha Andolan)
शिरोळ तालुका आज कडकडीत बंद ठेवण्यात आला. सकाळी ११ वाजता तालुक्यातील विविध गावांतून मराठा समाजबांधव रॅलीने येथील शिवाजी चौकात दाखल झाले. त्यानंतर मोर्चाची सुरवात झाली.
जालना जिल्ह्यातील आंदोलकांवर लाठीचार्ज व गोळीबार करण्याचे आदेश देणाऱ्याचा शोध घ्यावा, तसेच राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित पवारांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी केली.
दरम्यान, जयसिंगपुरच्या माजी नगराध्यक्षा नीता माने, माजी जि. प. सदस्य स्वाती सासणे, साजिदा घोरी, महिपती बाबर, रामभाऊ मधाळे, विठ्ठल मोरे, डॉ. अतुल पाटील, चंद्रकांत जाधव-घुणकीकर, बंटी देसाई, आप्पा बंडगर, प्रतीक पाटील यांनी मनोगत व्यक्त केली.
यावेळी माजी आमदार उल्हास पाटील, शिरोळचे नगराध्यक्ष अमरसिंह पाटील, भाजयुमो जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज यादव, आंदोलन अंकुशचे धनाजी चुडमुंगे, डॉ. सविता पाटील, शिवप्रतिष्ठानचे रावसाहेब देसाई, आगरचे सरपंच अमोल चव्हाण, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष विक्रमसिंह जगदाळे, सागर धनवडे, धनाजी पाटील-नरदेकर, सर्जेराव पवार, सचिन शिंदे, पराग पाटील यासह शिरोळ तालुक्यातील मराठा समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आज श्रावण सोमवार असून देखील येथील सर्व व्यवहार तसेच विविध प्रकारचे धार्मिक विधी बंद ठेवून गावातील सर्वच समाजाच्या वतीने बंदला पाठिंबा दिला. नेहमी गजबजणारी येथील प्रसिद्ध मिठाई व्यापार पेठ, भाजी मंडई, बस स्थानक परिसरात शुकशुकाट होता. व्यापारी असोसिएशनच्या वतीने संपूर्ण दिवसभर सर्व व्यवहार बंद ठेवण्यात आले.
दरम्यान श्रावण सोमवार असल्याने येथे दिवसभर दत्त दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची गर्दी मोठ्या प्रमाणात झाली होती. मात्र, आजच्या बंदमुळे येथे येणाऱ्या भाविकांची मोठ्या प्रमाणा गैरसोय झाली. तर दत्त दर्शनावेळी लोकांना देवासमोर ठेवण्यासाठी नारळ, पेढे, कापूर, पूजा साहित्य मिळू शकले नाही.
हेही वाचा